मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे सत्तास्थापनेत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यात सत्तास्थापनेविषयी काही चर्चा झाली का, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, दिवाळीनंतर या दोन्ही नेत्यांची बैठक होणार असल्याचे कळते.
विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेची महायुतीमधील बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. त्यामुळे गुरुवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत उद्धव ठाकरे यांच्या देहबोलीत आक्रमकता दिसून आली होती.
वाघाच्या हातात कमळ, गळ्यात घड्याळ! शिवसेनेच्या मनात नेमकं काय?
यावेळी त्यांनी म्हटले होते की, लोकसभा निवडणुकीवेळी ठरलेल्या फॉर्म्युलानुसार शिवसेना आणि भाजप यांच्यात विधानसभेला समसमान जागावाटप होणार हे ठरले होते. मात्र, भाजपच्या नेत्यांनी आमची अडचण समजून घ्यावी, अशी विनंती केली होती. तेव्हा आपण अडचण समजून घेत विधानसभेच्या जागावाटपात कमीपणा घेतला. पण आता त्यांच्या अडचणी आणखी वाढणार असतील तर आम्हाला त्या समजून घेता येणार नाहीत.
'येत्या काळात भाजपा हाच शिवसेनेचा प्रमुख विरोधी पक्ष राहील'
आता केवळ फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युलाची अंमलबजावणी व्हावी. त्यासाठी संपूर्ण निकाल हातात आल्यानंतर शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी एकत्र बसावे. गरज पडल्यास अमित शहा मुंबईत येतील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.