वाघाच्या हातात कमळ, गळ्यात घड्याळ! शिवसेनेच्या मनात नेमकं काय?

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात हालचाली वाढू लागल्या आहेत.

Updated: Oct 25, 2019, 01:31 PM IST
वाघाच्या हातात कमळ, गळ्यात घड्याळ! शिवसेनेच्या मनात नेमकं काय? title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात हालचाली वाढू लागल्या आहेत. भाजप हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला असला तरी त्यांना स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. भाजपला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजपाला टोला देणारं सूचक ट्विट केलं आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. त्यातूनच शिवसेनेनं आज भाजपावर प्रहार केला आहे. संजय राऊतांनी एका फोटो ट्विट केलाय. त्यात वाघाच्या हातात कमळ आणि गळ्यात घड्याळ दाखवण्यात आलं आहे. संजय राऊतांनी हाच फोटो ट्विट करत व्यंगचित्रकाराची कमाल...बुरा न मानो दिवाली है असं कॅप्शन दिलं आहे.

विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. आदित्य ठाकरे यांनी वरळीतून मोठा विजय संपादन केला. विजयानंतर आता वरळीमध्ये आदित्य ठाकरे हे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स झळकू लागले आहेत.

शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद पाहिजे की मुख्यमंत्रिपद हे त्यांनी ठरवायचं असल्याचं सूचक वक्तव्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी विजय जल्लोषानंतर येवल्यात पत्रकारांशी बोलताना केलं. राज्यातल्या निवडणूक निकालात स्पष्ट बहुमत कोणालाच मिळालेलं नाही. त्यामुळे काहीही घडू शकतं अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातून भुजबळ चौथ्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत.