Nawab Malik : नवाब मलिक यांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

Nawab Malik : गेल्या वर्षी उच्च न्यायालयाने वैद्यकीय जामिनासाठी केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्यानंतर मलिक यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. न्यायालायने मलिक यांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे

Updated: Jan 6, 2023, 06:38 PM IST
Nawab Malik : नवाब मलिक यांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ title=
(फोटो सौजन्य - PTI)

Nawab Malik : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले  माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते  नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी (money laundering case) नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली आहे.

दरम्यान, न्यायालयाने ईडीला (ED) नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या प्रकृतीच्या स्थितीबाबत २ आठवड्यांच्या आत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांचा जामीन अर्ज मुंबईच्या विशेष न्यायालयाने ३० नोव्हेंबर रोजी फेटाळला होता. त्यानंतर मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सोमवारी न्यायमूर्ती एमएस कर्णिक यांच्या खंडपीठासमोर मलिक यांचे वकील तारक सय्यद आणि कुशल मोर यांनी त्यांच्या याचिकेचा उल्लेख केला होता. त्यांनी वैद्यकीय कारणास्तव तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली होती. मलिक हे गेल्या काही दिवसांपासून मुंबई उपनगरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असलेल्या कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंड मालमत्ता खरेदी प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मलिक यांना फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. मलिक यांना ईडीने 23 फेब्रुवारी रोजी त्यांच्या घरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. 8 तासांच्या चौकशीनंतर मलिक यांना अटक करण्यात आली होती. मलिक यांना सुरुवातीला ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने मलिक यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती.

नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून आरोग्याच्या समस्येने त्रस्त असल्याने एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. पुढील आदेशापर्यंत ते रुग्णालयातच राहतील, असे विशेष न्यायालयाने सांगितले होते. विशेष न्यायालयाने मलिक यांच्या प्रकृतीच्या स्थितीचा विचार करून जामीन मंजूर करण्याची मागणी करणारे निवेदन याआधी स्वीकारले नव्हते. मलिक आरोग्याच्या अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. त्यांच्या वैद्यकीय अहवालात त्यांची डावी किडनी व्यवस्थित काम करत असल्याचे नमूद करण्यात आल्याचे त्यांच्या वकिलांनी निवेदनातून निर्दशनास आणून दिले होते.

मलिकांवर आरोप काय? 

नवाब मलिक, त्याचा भाऊ अस्लम, हसीना पारकर आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी सरदार खान यांच्यात कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंड संदर्भात अनेक बैठका झाल्या होत्या. ही जागा खरेदी करण्यासाठी हसीना पारकरला 55 लाख रुपये बेकायदेशीरपणे दिले गेले. या बेकायदेशीर व्यवहारात नवाब मलिक यांचा सक्रीय सहभाग होता, असा आरोप ईडीकडून मलिकांवर करण्यात आला आहे