राजकारणात मोठी उलथापालथ; अजित पवार तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत?

Maharashtra Politics News : राज्याच्या राजकारणात असंख्य घडामोडींना वेग आलेल्या असतानाच आता अजित पवार तिसऱ्या आघाडीच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे...   

Updated: Jul 15, 2024, 12:05 PM IST
राजकारणात मोठी उलथापालथ; अजित पवार तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत? title=
Maharashtra Politics News Ajit pawar on the way to make third aghadi alliance latest update

Maharashtra Politics News : महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली असून, आता आणखी एका राजकीय बदलाचे संकेत स्पष्टपणे मिळताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे, अजित पवार येत्या काळात तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. वंचित, MIMसोबत विधानसभेत वेगळे आव्हान निर्माण करणार करण्याची तयारी आहे. छगन भुजबळ असुरक्षित झाल्याची भावना असून, ही भाजपची नवीन खेळी असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

एकिकडे शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या भेटीची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे राज्यातील राजकारण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळत आहे. एकूणच येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला विजय निश्चित करायचा असल्यामुळे त्याच दृष्टीकोनातून ही पावलं टाकली जात असल्याचं म्हटलं जात आहे. प्राथमिक स्तरावर महायुतीतून अजित पवार यांनी स्वतंत्र आघाडी तयार करून एमआयएम, वंचित यांना एकत्र घेऊन त्यांची एक आघाडी तयार करायची आणि असं केल्यास मविआच्या मतांचं विभाजन होऊ शकतं आणि त्यानंतर महायुतीला हा फायदा मिळून तिसऱ्या आघाडीमुळं राजकीय समीकरणं बदलू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

हेसुद्धा वाचा : छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर, मात्र अर्धा तासांपासून वेटिंगवर

प्राथमिक स्तरावर समोर आलेल्या माहितीनुसार तिसऱ्या आघाडीतील मंत्रीपदं आणि त्यापुढील गणितं नंतर ठरवली जाणार असून, या सर्व परिस्थितीमध्ये छगन भुजबळ हे अस्वस्थ झाले असून, त्यामुळे त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचं म्हटलं जात आहे. एकिकडे पवारांवर निशाणा साधत 12 तासांच्या आत त्यांचीच भेट घेण्यासाठी जाण्याचा भुजबळांचा निर्णय पाहता एक मोठी राजकीय घडामोड राज्यात पाहायला मिळत असल्याचं स्पष्ट होत आहे. 

 

अजित पवारांसमवेत वेगळी आघाडी असून, त्या माध्यमातून मतांची फाटाफूट करण्यासाठी कैक समीकरणं सध्या बदलताना दिसत आहेत. भुजबळ जेव्हा अजित पवारांसमवेत गेले होते तेव्हा ओबीसी नेते अशी आपली ओळख रहावी असा त्यांचा स्पष्ट प्रयत्न होता. वारंवार सरकारमध्ये राहून मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी आपली मतं ठामपणे मांडली. जर तिसरी आघाडी अस्तित्वात येत असेल आणि त्यात वंचित, एमआयएम आणि बच्चू कडू, सदाभाऊ खोत असे पक्ष सोबत असतील तर भुजबळांचं स्थान अप्रत्यक्षरित्या कमी होताना दिसत असून, मधल्या काळातील त्यांची नाराजी पाहता कुठेतरी याच भूमिकेतून थोरल्या पवारांची भेट घेतल्याचं म्हटलं जाऊ शकतं, असं विश्लेषण झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी केलं. 

महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी अवघे 100 दिवसही उरलेले नसताना दोन मोठे नेते भेटणं पाहता तिसरी आघाडी झाल्यास भुजबळांच्या स्थानाला धक्का लागणं अपेक्षित असून, ही राजकीय अस्वस्थता असल्याचं म्हणणं वावगं ठरणार नाही. त्यामुळं आता खरंच ही तिसरी आघाडी अस्तित्वात येते का हे पाहणं महत्त्वाचं असेल.