'स्वराला हिजाबमध्ये ठेवल्याबद्दल तुला...'; एल्विशच्या पोस्टने वाद! महाराष्ट्र निवडणूक कनेक्शन

Elvish Yadav Remark Against Fahad Ahmad Mention Swara Bhasker: अभिनेत्री स्वरा भास्करचा पती महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होता.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 24, 2024, 03:58 PM IST
'स्वराला हिजाबमध्ये ठेवल्याबद्दल तुला...'; एल्विशच्या पोस्टने वाद! महाराष्ट्र निवडणूक कनेक्शन title=
त्या पोस्टमुळे नव्या वादाला फुटलं तोंड

Elvish Yadav Remark Against Fahad Ahmad Mention Swara Bhasker: प्रसिद्ध युट्यूब स्टार आणि बिग बॉस ओटीटी-2 चा विजेता असलेल्या एल्विश यादवने बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करचा पती फवाद अहमदच्या पराभवावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये फवाद अहमद हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढला. शनिवारी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. फवाद निवडणूक लढलेल्या अनुशक्ती नगर मतदासंघामधून मतमोजणीमध्ये मागे पडल्यानंतर स्वरा आणि फवादने ईव्हीएमला दोष दिला होता. या मतदारसंघामधून अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या कन्या सना खान निवडून आल्या आहेत. 

फवादने केला गंभीर आरोप

फवादने ईव्हीएमसंदर्भातील आरोप करण्याआधी आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन एक व्हिडीओ पोस्ट केलेला. या व्हिडीओमध्ये त्याने फेरमतमोजणीची मागणी केली होती. 16,17,18 आणि 19 व्या फेरीतील मतं पुन्हा मोजली जावीत अशी मागणी करत या प्रकरणात भारतीय निवडणूक आयोगाने चौकशी करावी असं फवादने म्हटलं होतं.  ईव्हीएम मशीन 99 टक्के चार्ज होत्या. याच कारणामुळे आपली विरोधक सना खानला दिलेली मतं दोनदा किंवा तिनदा मोजली गेली असा दावा फवादने केला होता. 

एल्विशची कमेंट

"99 टक्के बॅटरी चार्जिंक आणि भाजपाच्या सहकाऱ्याचा विजय," अशी कॅप्शन फवादने या व्हिडीओला दिली होती. या व्हिडीओवर एल्विश यादवने प्रतिक्रिया नोंदवली आहे. "स्वराला हिजाबमध्ये ठेवल्याबद्दल तुला मिळालेली ही शिक्षा आहे," असं वाक्य लिहून एल्विशन यादवने हा व्हिडीओ कोट करुन रिट्वीट केला आहे. अनेकांनी एल्विशची ही पोस्ट फारच वादग्रस्त असल्याचं म्हणत आक्षेप घेतला आहे.

स्वराची तक्रार

दरम्यान, स्वरानेही आपल्या एक्स हॅण्डलवरुन ईव्हीएमसंदर्भात तक्रार नोंदवली होती. "अनुशक्ती नगर विधानसभेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फहाद अहमदला आघाडी मिळालेली असताना अचानक 17,18,19 व्या फेरीमध्ये 99 टक्के चार्ज असलेली इव्हीएम उघडण्यात आली. त्यानंतर अजित पवारांच्या पक्षाच्या उमेदवाराने आघाडी घेतली," असा आरोप स्वराने केला आहे. स्वराने निवडणूक आयोगाच्या हॅण्डलबरोबरच महाविकास आघाडीतील नेत्यांना टॅग करुन एक सवालही विचारला आहे. "दिवसभर मतदान झाल्यानंतरही इव्हीएम 99 टक्के चार्ज कशा काय राहिल्या? सगळी मतं भाजपा आणि त्यांच्या समर्थकांना देण्यासाठी या चार्ज केल्या का?" असा सवाल स्वराने केला आहे.

स्वरा ही स्वत: फवादसाठी प्रचार करत होती. फवाद आणि स्वराचं फेब्रुवारी 2023 मध्ये लग्न झालं आहे.