Omprakash Raje Nimbanlkar Post: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर झालेल्या लोकसभेत ठाकरेंच्या शिवसेनला चांगले यश मिळाले तर विधानसभेत त्यांना निराशेला सामोरे जावे लागले. यानंतर अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली. ही रिघ काही थांबताना दिसत नाहीय. त्यात आता उद्धव ठाकरेंना आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार ओम राजे निंबाळकर हे पक्षाला 'जय महाराष्ट्र'करणार अशी चर्चा सोशल मीडियात रंगली होती. दरम्यान या बंडाळीच्या वृत्ताला दुजोरा देणारी पोस्ट सोशल मीडियात पाहायला मिळाल्या. यावर ओमराजे निंबाळकर यांच्याकडून कोणती प्रतिक्रिया आली नव्हती. पण आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची आणखी एक पोस्ट सोशल मीडियात चर्चेत आलीय. आनंद दिघे साहेब यांना जयंतीनिमित्त अभिवादन करतानाच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांचा फोटो काढला आहे. ओमराजे निंबाळकर हे महायुतीचे असल्याचे सांगत ते लवकरच प्रवेश करतील असा दावा काल प्रताप सरनाईक यांनी केला होता. ठाकरेंच्या शिवसेनेचे काही नेते आपल्या संपर्कात असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले होते. दरम्यान प्रताप सरनाईक आणि उदय सामंत यांच्या दाव्याला दुजोरा देणारी पोस्ट पाहायला मिळतेय. ओमराजे यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट खूप काही सांगणारी आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी मशाल ठेवली मात्र उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना वगळले.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धर्मवीर आनंद दिघे यांना जयंती निमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिवादन केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेल्या दिघे साहेबांनी लोककल्याणासाठी, हक्काच्या संघर्षासाठी आपले सर्वस्व पणाला लावले.त्यांचे कार्य आणि एकनिष्ठतेची शिकवण आम्हा शिवसैनिकांना प्रेरणादायी असल्याचे निंबाळकरांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. इथपर्यंत सारकाही ठिक होतं पण या फोटोत त्यांनी आपले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरे यांचा फोटो वगळला. यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या आहेत.
धर्मवीर स्व.आनंद दिघे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेल्या दिघे साहेबांनी लोककल्याणासाठी, हक्काच्या संघर्षासाठी आपले सर्वस्व पणाला लावले.
त्यांचे कार्य आणि एकनिष्ठतेची शिकवण आम्हा शिवसैनिकांना… pic.twitter.com/pyKKamqdgT
— Omprakash Rajenimbalkar (@OmRajenimbalkr) January 27, 2025
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पोस्टवर चर्चा झाल्यानंतर त्यांनी ठाकरेंचा फोटो नसलेली पोस्ट डिलीट केली. यानंतर नवी पोस्ट अपलोड केली, ज्यामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो असलेली पोस्ट अपलोड करण्यात आली.