Crime News : राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे असं म्हणतात. रागाच्या भरात व्यक्ती कोणत्याही थराला जाऊन टोकाचं पाऊल उचलतो. सध्याच्या घडीला तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानांच कमालाची राग येत असल्याचं पाहायला मिळतंय. असाच काहीसा प्रकार कल्याणमध्ये समोर आलाय. रागाच्या भरात एका अल्पवयीन मुलाने नऊ वर्षाच्या मुलीची निर्घुणपणे हत्या केलीय. 15 वर्षीय मुलाने नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये समोर आलाय. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील एसटी आगराच्या जवळ असलेल्या एका हायप्रोफाईल सोसायटीच्या आवारात हा सर्व प्रकार घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात हत्येसह अत्याचार आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीकडे चौकशी सुरु केली आहे. (kalyan 15 year old boy raped and killed minor girl)
तासाभरात आरोपीला अटक
कल्याण पश्चिम परिसरातील एसटी आगरच्या जवळ असलेल्या एका हायप्रोफाईल सोसायटीच्या आवारात गुरुवारी पहाटेच्या सुमारास नऊ वर्षीय मुलीचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासास सुरुवात करत अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. यावेळी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तासाभरातच अल्पवयीन आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर त्याचा शोध घेऊन त्याला स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले आहे.
मुलाने दिली गुन्ह्याची कबुली
"मुलीच्या वडिलांनी मला काही दिवसापूर्वी मारहाण केली होती. त्यामुळे त्यांच्या मुलीवर अत्याचार करून तिची ब्लेडने गळा चिरून हत्या केली," अशी कबुली आरोपीने पोलिसांकडे दिली आहे.