मुंबई : राज्याच्या राजकारणाला सध्या नाट्यरूप स्वरूप प्राप्त झाले आहे. काँग्रेसच्या आमदारांशी अनैतिक संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे, काहीतरी करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे, ते काही करू शकतात याची आम्हाला जाणीव आहे, म्हणून काँग्रेसच्या सर्व आमदारांना जयपूरला नेत आहोत, जोपर्यंत इथे मतदान होत नाही तोपर्यंत त्यांना जयपूरला ठेवण्यात येईल अशी प्रतिक्रिया काँगेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
दरम्यान, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी विकासआघाडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्याचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निर्णय रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सकाळी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक झाली. त्यावेळीच कायदेशीर मार्गाने लढाई लढणार असल्याचे तिन्ही पक्षांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
राज्यातील सत्तास्थापनेचा पेच आता न्यायालयात पोहोचला आहे. दरम्यान यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सुरु असलेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे ५० आमदार उपस्थित असल्याची माहिती आहे.