'जे पळाले त्यांना शिवसेना संपवायची होती' आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप

मध्यावधी निवडणुकीसाठी शिवसेना पूर्ण ताकदीने सज्ज - आदित्य ठाकरे

Updated: Jul 4, 2022, 02:11 PM IST
'जे पळाले त्यांना शिवसेना संपवायची होती' आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप title=

Maharashtra Assembly : जे पळाले त्यांना शिवसेना संपवायची होती असा गंभीर आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे, पण शिवसेना (Shivsena) कधी संपणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय.

ज्यांनी बंडखोरी केली ते आमदार कधी सूरत, कधी गुवाहाटी तर कधी गोव्याला राहिले, पण जेव्हा ते आपल्या मतदारसंघात जातील आणि आपल्या मतदारांना भेटतील तेव्हा काय होईल हे आम्ही पाहतोय.

कुर्ल्यात जेव्हा इमारत कोसळली होती तेव्हा आम्ही गेलो होतो, तिथले आमदार गुवाहाटीत पार्टी करत होते, त्यामुळे हे आमदार जेव्हा आपल्या मतदारसंघात जातील तेव्हा त्यांना कळेल मतदारांचं मन कोणाच्या बाजूने आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

काल विधानसभा अध्यक्षपदाची जी निवडणूक झाली तीसुद्धा आम्ही कायदेशीर नसल्याचं मानतो, कारण आमचा व्हीप अधिकृत होता, आणि तोच कायम राहिल आम्ही कोर्टातही ते सिद्ध करु असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवला.

जन्म पक्षात असं काही करु शकतात ते कर्म पक्षातही असंच होईल याची आम्हाला खात्री आहे. ज्यांनी पक्ष पोखरून काढण्याचा प्रयत्न केला, लोकं सोबत नेण्याचा प्रयत्न केला, ज्या पक्षात गेलेत त्यांना शुभेच्छा देत सावध राहण्याचा सल्ला देतो, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

मध्यावधी निवडणुकांसाठी आम्ही सज्ज आहोत, प्रचंड ताकदीने शिवसेना विधानसभेत पुन्हा दिमाखात भगवा फडकावेल असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.