भाजपच्या तावडीतून आपला गड खेचून आणण्यात काँग्रेस यशस्वी होणार?

काँग्रेसचं राज्यातलं नेतृत्व घडवणारा जिल्हा अशी लातूरची ओळख... या जिल्ह्यानं राज्याला एक नव्हे तर दोन मुख्यमंत्री दिलेत. 

Updated: Jun 11, 2018, 11:34 PM IST
भाजपच्या तावडीतून आपला गड खेचून आणण्यात काँग्रेस यशस्वी होणार? title=

शशिकांत पाटील, झी मिडीया, लातूर : काँग्रेसचं राज्यातलं नेतृत्व घडवणारा जिल्हा अशी लातूरची ओळख... या जिल्ह्यानं राज्याला एक नव्हे तर दोन मुख्यमंत्री दिलेत. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दोनदा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवलं. तर त्यांच्या आधी, १९८५मध्ये ९ महिन्यांच्या अल्प कालावधीसाठी शिवाजीराव पाटील-निलंगेकर हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत विराजमान झाले होते.  केंद्रात गृहमंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष राहिलेले शिवराज पाटील-चाकूरकरही लातूरचेच... २००४ मध्ये काँग्रेस नेते शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या स्नुषा रूपाताई पाटील-निलंगेकर यांना गोपीनाथ मुंडे यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या आखाड्यात उतरविल आणि सलग ७ वेळा लोकसभेत पोहोचणाऱ्या शिवराज पाटील चाकूरकरांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेत २००९पासून लातूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. 

लातूर शहर, लातूर ग्रामीण, निलंगा, अहमदपूर आणि उदगीर हे लातूर जिल्ह्यातले तर लोहा-कंधार हा नांदेड जिल्ह्यातला विधानसभा मतदारसंघ मिळून लातूर लोकसभा मतदारसंघ तयार झाला. त्या वर्षी विलासराव देशमुखांनी आपले कट्टर समर्थक असलेल्या कोल्हापूरच्या जयवंत आवळे यांना उमेदवारी देऊन खासदार बनविले. मात्र २०१२ साली विलासरावांच्या निधनानंतर लातूरमधल्या काँग्रेसची वाताहत झाली. २०१४ च्या मोदी लाटेत भाजपचे डॉ. सुनील गायकवाड २ लाख ५३ हजार ३९५ मताधिक्यानं निवडून आले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही निलंगा, उदगीर विधानसभेवर भाजपानं कब्जा केला. अहमदपूरचे अपक्ष आमदार आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार विधानसभेतील शिवसेना आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभेवर अद्यापही काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांचे चिरंजीव, माजी मंत्री अमित देशमुख यांचं वर्चस्व आहे. 

निलंग्याचे आमदार संभाजी पाटील-निलंगेकर पालकमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यातील निलंगा, उदगीर, अहमदपूर या नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला. तर रेणापूर, चाकूर, देवणी, शिरूर अनंतपाळ येथील नगरपंचायत निवडणुकीतही भाजपचाच वरचष्मा कायम आहे. विशेषबाब म्हणजे जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच लातूर जिल्हा परिषद आणि लातूर महानगरपालिकेवरही भाजपनं बहुमत मिळवीत सत्ता मिळविली. त्यामुळेच लातूर हा काँग्रेसचा गड आता भाजपमय झाल्याचे दिसून येत आहे. तर आपल्या खासदारकीच्या काळात संसदेत १०० टक्के उपस्थिती लावून मतदारसंघातील १४०० पैकी ८०० गावात पोहोचल्याचा दावा खा. डॉ. सुनील गायकवाड करीत आहेत. 

 

पण केवळ सर्व पक्षासोबत सलोख्याचे संबंध ठेवून आणि जनसंपर्क दांडगा ठेवून निवडणूका जिंकता येत नसल्याची टीका प्रमुख विरोधक असणाऱ्या काँग्रेसनं केलीये. खासदारांनी दिवसास्वप्नं बघणं सोडण्याचा सल्लाही काँग्रेसनं दिलाय. मात्र खासदारांचा दांडगा जनसंपर्कच त्यांची जमेची बाजू असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. 

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी होती. तर भाजप-शिवसेना युतीचाही लाभ विद्यमान खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना झाला होता. आता काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री अमित देशमुख आणि भाजपकडून राज्याचे कामगारमंत्री-लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातच लढत रंगणार आहे. त्यामुळे भाजपच्या तावडीतून आपला गड खेचून आणण्यात काँग्रेस कितपत यशस्वी होणार का भाजपचा हा नवा गड अभेद्य होईल हे पाहणे आता रोचक ठरणार आहे.