ठाणे : स्मार्ट शहर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या ठाणे महापालिकेपासून एक ते दीड किमीच्या अंतरावरील ज्ञानेश्वर नगर परिसरातील नागरिकांना गेल्या चार महिन्यांपासून अक्षरशः गढूळ पाणी प्यावे लागत आहे. विशेष म्हणजे हे गढूळ पाणी पिऊन या परिसरातील जवळपास ७० टक्के नागरिकांना जुलाब, उलट्या, ताप यासारखे आजार झाले असून आतापर्यंत या परिसरात डेंग्यूने दोघांचा मृत्यू झाला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हे गढूळ पाणी पिऊन या परिसरात असणाऱ्या प्रत्येक घरातील एक किंवा दोन सदस्य आजारी पडत असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे . यावर त्वरित उपाय न केल्यास साथीचे आजार बळावण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे .
ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये सध्या डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढले असून ज्ञानेश्वर नगर परिसरातील एका मुलीचा नुकताच डेंग्यूने मृत्यू झाला आहे . या मुलीबरोबरच याच परिसरातील मोरे नामक व्यक्तीला देखील डेंग्यूची लागण होऊन त्याचा मृत्यू झाला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
ठाणे महापालिकेच्या काही अंतरावर असणाऱ्या ज्ञानेश्वर नगर परिसरात अक्षरशः भयावह परिस्थिती असून या परिसरातील रहिवाशांना जेवढे पाणी येते तेवढे गढूळ येत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत.
पावसाळा सुरु झाल्यापासून या गढूळ पाण्याचा वापर पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी नागरिकांना करावा लागत आहे . हे पाणी इतके गढूळ आहे कि एक तर पाणी नागरिकांना उखळून प्यावे लागत आहे, नाहीतर या पाण्यात तुरटी टाकून मग या पाण्याचा वापर नागरिकांना करावा लागत आहे .
ज्ञानेश्वर नगर परिसरातील लोकसंख्या ही १२ ते १५ हजारांच्या घरात आहे . या परिसरात बहुतांश बैठी चाळी असून जेवढी घरे या परिसरात आहे तेवढ्या सर्व घरांमध्ये असेच गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे . मोठ्या नागरिकांमध्ये लहान मुलांना देखील ताप आणि आणि झुलाबासारखे आजार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातारण आहे.
शुद्ध पाणी मिळावे यासाठी या परिसरातपासून ५०० मीटर अंतरावर जाऊन पाणी आणावे लागत असून ते सुद्धा पाणी मिळेल का नाही देखील सांगता येत नाही . अनेकवेळा स्थानिक नगरसेवकाला विचारणा करूनही नगरसेवकांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
विशेष करून या सर्व समस्येला महिला वर्ग कंटाळला असून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त करण्यात येत आहे.आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असल्याने नागरिकांचा जीव गेला असून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.
या समस्येचा सातत्याने पाठपुरावा करणारे नागरिकांनी तर आता थेट आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. पाणी एवढे दूषित आहे की तुरटी टाकून पाण्यातील गाळ खाली बसला की मग हे पाणी वापरता येते . नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा हा प्रकार असून प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे या परिसरातील रहिवाशी यांनी सांगितले.