सिंधुदुर्गाचं चेडूक दहावीत १०० टक्के गुण मिळवून राज्यात पहिलं

 पांग्रडच्या आस्था मर्गजला शंभर टक्के गुण मिळालेयत

Updated: Aug 3, 2020, 02:34 PM IST
सिंधुदुर्गाचं चेडूक दहावीत १०० टक्के गुण मिळवून राज्यात पहिलं title=

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गच्या कुडाळमधील पांग्रडच्या आस्था मर्गजला शंभर टक्के गुण मिळालेयत. त्यामुळे राज्यातून पहिली येण्याचा मान तिला मिळालाय. याचा संपुर्ण सिंधुदुर्गवासियांना अभिमान वाटतोय. कुडाळ हायस्कूल या शाळेत ती शिकत होती. सिंधुदुर्ग जिल्हा आणि राज्यात पहिली आल्याने सर्व स्तरातून तिचं कौतूक होतंय. 

आस्थाला बालपणापासून शिक्षणासोबतच विविध कलांची आवड आहे. त्यामुळे ती चित्रकला, स्कॉलरशिप, होमीभाभा, महाराष्ट्र टॅलेंट सर्च अशा शाळाबाह्य परिक्षेत सहभागी होत असते. केवळ सहभागच नव्हे तर यातही ती अव्वल येत असते. अशा अनेक स्पर्धांमध्ये तीने पुरस्कार मिळवले आहेत. 

चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत तिने  जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला होता. तिचे अभ्यासातील प्राविण्य पाहून राष्ट्रीय शिष्यवृत्ती देखील तिला मिळाली आहे. 

शालेय जीवनात आस्था ने कोणतीच स्पर्धा सोडली नाही. प्रज्ञा बोध, सुबोध, प्राविण्य आदी परीक्षेत ती मेरिट मध्ये पास झाली.  संकल्पनांवर  विशेष भर देत, गाईड अपेक्षित यांचा संदर्भ म्हणून वापर करून स्वतःच्या शब्दात उत्तरे लिहून परीक्षा दिली व जिल्ह्यात व महाराष्ट्रात  प्रथम येण्याचा  मान पटकवला.

पाठ्यपुस्तकांचे वाचन,आकलन आणि स्वभाषेत लेखन यावर भर देऊन प्रत्येक परीक्षेत यशाची पायरी चढत गेली.   
 
वक्तृत्व, चित्रकला, प्रश्नमंजुषा, गणित ,विज्ञान, जनरल नॉलेज, क्रीडा स्पर्धा अशा सर्व स्पर्धात यशस्वी होऊन अनेक बक्षिसं तिनं मिळवलीयत. कथ्थक नृत्यातही तिनं आतापर्यंच पाच परीक्षा दिल्यायत. 

आस्थाची आई स्पर्धा परीक्षेतील लेखी परीक्षेसाठी मार्गदर्शन क्लासेस घेतात. तर वडील  कुडाळ हायस्कुलमध्ये शिकवतात. चिकाटी, जिद्द, आत्मविश्वास, नित्य अभ्यास सराव पेपर सोडविले तर असं यश नक्कीच मिळू शकते असाविश्वास आस्थाने व्यक्त केलाय.

तिला आयआयटी इंजिनिअरिंग करून यूपीएससी परीक्षा द्यायची आहे. नुकतेच सावंतवाडी संस्थान, मराठा समाज कुडाळ विभागाने आयोजित केलेल्या विद्यार्थी गुणगौरव समारंभात तिचा भव्य सत्कार करण्यात आल्याचे पदाधिकारी बाळ पंडीत यांनी सांगितले.