माढामधील शेतकऱ्यांचा भ्रमनिरास, पवारांच्या उमेदवारीवर जनता नाराज?

शरद पवार माढातूनच लोकसभेवर निवडून गेले होते. पण सामान्य शेतकऱ्यांचा मात्र भ्रमनिरास झाला आहे.

Updated: Feb 12, 2019, 05:44 PM IST
माढामधील शेतकऱ्यांचा भ्रमनिरास, पवारांच्या उमेदवारीवर जनता नाराज? title=
संग्रहित छाया

सचिन कसबे / सोलापूर : माढा मतदारसंघातून शरद पवार लोकसभा लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. पवार यापूर्वी २००९मध्येही माढातूनच लोकसभेवर निवडून गेले होते. २००९पासून २०१९पर्यंत माढा राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. पण सामान्य शेतकऱ्यांचा मात्र भ्रमनिरास झाला आहे.  माढ्याच्या जनतेच्या कानोसा घेतल्यानंतर ही बाब पुढे आली आहे. शरद पवार माढ्यातून लढणार याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पवारांच्या संभाव्य उमेदवारीचे माढ्यातही पडसाद उमटू लागलेत. २००९ साली माढ्यातून पवार लोकसभेवर निवडून गेले होते. त्यावेळी पवार बारामतीसारखी माढ्यात विकासगंगा आणतील असे मतदारांना वाटले होते. मात्र, गेल्या चार वर्षांत तसे काहीही बदल होताना दिले नाहीत, असे येथील जनतेच्या प्रतिक्रियांवरुन दिसून येत आहे. विकासकामांना प्राधान्य न मिळाल्याने जनता नाराज आहे. 

पवारांना दिलेल्या आश्वासनांचा विसर

पवारांनी केळी संशोधन  केंद्राचं आश्वासन दिले होते. शिवाय जर्सी गाय पैदास केंद्र माढ्यात आणू असेही सांगितले होते. दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आश्वासन दिले होते. निवडून आल्यानंतर पवार यांना या सगळ्या आश्वासनांचा विसर पडल्याचा आरोप माढ्याचे मतदार करत आहेत. याबात शेतकरी नाना जगताप, नवनाथ कदम यांनी तशी नाराजी व्यक्त केली. गेल्या दहा वर्षांत पवारांनी माढ्याकडे हवे तसे लक्षच दिले नाही. त्यामुळे पवारांनी माढा मतदारसंघातून उमेदवारीच घेऊ नये, असे इथल्या शेतकऱ्यांना वाटत आहे. शेतकरी आत्माराम गोरखणे आणि राहुल पवार यांनीही नाराजी व्यक्त करत पवारांनी या ठिकाणाहून निवडणूक लढवू नये, अशी अपेक्षा व्यक्त करताना दिसत आहेत.

२००९मध्ये माढ्यातील जनतेनं पाच लाख ३० हजार मते पवारांच्या पारड्यात टाकली होती. पवारांविरोधात तुल्यबळ उमेदवार दिल्यास यंदा पवारांना एवढी मते मिळतील की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.