नाशिक: सळईच्या ट्रकमध्ये घुसली पिकअप, भीषण अपघातात 6 ठार! अपघातापूर्वीचं Video Status समोर

Nashik Mumbai Highway Dwarka Accident: रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातामध्ये सहा जणांनी प्राण गमावले.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 13, 2025, 08:27 AM IST
नाशिक: सळईच्या ट्रकमध्ये घुसली पिकअप, भीषण अपघातात 6 ठार! अपघातापूर्वीचं Video Status समोर title=
नाशिकमधील अपघाताआधीचा व्हिडीओ व्हायरल

Nashik Mumbai Highway Dwarka Accident: (सागर गायकवाड/नाशिक प्रतिनिधी) नाशिकमधील द्वारका उड्डाणपुलावर रविवारी सायंकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामध्ये लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकला पिकअपने मागून धडक दिली. या पिकअपमधून जाणाऱ्या तरुणांनी अपघाताच्या काही मिनिटांआधी पोस्ट केलला धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. 

नक्की घडलं काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई-नाशिक महामार्गावर हा भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये सहा तरुणांनी प्राण गमावला असून 5 लोक जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चार मृतदेह जिल्हा रुग्णालयात असून मृतदेहांची ओळख पटवून शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. अन्य दोन जखमींचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. या दोन मृतांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर शवविच्छेदनासंदर्भातील पुढील प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती सिव्हिल सर्जन डॉ. चारुदत्त शिंदे यांनी दिली. 

सिडकोतील सह्याद्रीनगर येथील चेतन गंभीरे यांचा निफाडच्या धारणगाव येथे एका देवस्थानात धार्मिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी नातेवाईक व मित्रमंडळी टेम्पोने रविवारी सकाळी तिथे पोहचले होते. दिवसभर तेथे धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर जेवण आटोपून सायंकाळनंतर ते पुन्हा नाशिककडे परतत होते. छत्रपती संभाजीनगर महामार्गावरुन नाशिकमध्ये येत असताना त्यांनी उड्डाणपुलावर प्रवेश करुन सिडकोच्या दिशेने ते मार्गक्रमण करत होते. द्वारका येथून चालले असताना त्यांच्या पुढे लोखंडी गजाने भरलेला आयशर चालला होता. त्यावेळी टेम्पो चालकाला वेग नियंत्रित न करता आल्याने त्याने पाठीमागून आयशरला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की घटनास्थळावरच चौघांचा मृत्यू झाला तर एकाचा खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. मुंबई नाका आणि भद्रकाली पोलिस अपघाताची चौकशी करत आहेत.

शेवटचं व्हिडीओ स्टेटस...

दरम्यान, या भीषण अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणांनी अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी या पिकअपमधून प्रवास करताना काढलेला आणि स्टेटसला ठेवलेला व्हिडीओ समोर आला आहे. निफाडमधील एका देवस्थानाचे दर्शन करुन परतत असताना रविवारी रात्री आठच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. मृत सिडकोतील रहिवासी असून सर्व जण कामगार आहेत. नाशिकच्या निफाड तालुक्यात असलेल्या धारणगाव येथील देवाच्या कारणावरून परत येत असताना हे तरुण पिकअपमध्ये मागील बाजूला बसून मज्जा मस्ती करताना, गाणी लावून नाचताना दिसत आहेत. सर्व एकाच ठिकाणावरील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडिओ दिसणाऱ्या काही तरुणांचा मृत्यू झाला असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. कारणाचा कार्यक्रम उरकून नाशिककडे येत असताना चालत्या गाडीत हा व्हिडिओ काढला होता.

वाहतूक कोंडी

या भीषण अपघातामुळे काल सायंकाळी नाशिककडून मुंबईला येणारी वाहतूक ठप्प झाली होती. नाशिकमधील या उड्डाणपुलावर वाहनांच्या काही किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. 30 मिनिटांहून अधिक काळापासून वाहने एकाच जागी उभी होती.