Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. मात्र, काही ठिकाणी पाऊस धुमाकुळ घालणार असल्याचे चित्र आहे. ढगाळ वातावरणामुळं राज्यातील गारठा कमी झाला होता. किमान तापमान 10 अंशाच्या वर गेले होते. मात्र आजपासून पुन्हा एकदा तापमानात घट होणार असून गारठा वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
उत्तर भारतात थंडीच्या लाटेची स्थिती आहे. तर श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. उत्तर भारतात साधारण 140 नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत येत आहेत. त्यामुळं थंडी कमी अधिक होत असून जमिनीलगत दाट धुके पसरले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पुन्हा गारवा जाणवायला लागला आहे. ढगाळ वातावरण कमी झाल्याने गारठा कमी झाला आहे. रविवारी धुळे येथे 9.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज राज्यात आकाश स्वच्छ असून उद्यापासून किमान तापमानात घट होणार असून गारठा वाढण्याची शक्यता आहे.
प्रशांत महासागरात अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर ला – निनाची स्थिती सक्रीय झाली आहे. पण, ला – निना स्थिती खूपच कमकुवत असून, जेमतेम अडीच महिने म्हणजे मार्च अखेरपर्यंत सक्रीय राहण्याची शक्यता आहे. ला – निना कमकुवत असल्यामुळे भारतावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. कमकुवत ला – निना स्थिती मार्चअखेर सक्रीय राहण्याची शक्यता आहे. शिवाय कमकुवत ला – निनामुळे जागतिक हवामानावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. भारतीय उपखंड आणि भारतावरही फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही.