Makar Sankranti 2025 : संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव मानला जातो. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकरसंक्रांत असं म्हटलं जातं. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो. तो उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्या काळाला उत्तरायण ही म्हणतात. सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे. या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिक दृष्ट्यादेखील महत्त्व आहे. (Makar Sankranti sugad puja puja vidhi and sahitya muhurt and makarsankranti significance and importance)
संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन, अशा 12 संक्रांत असतात. मात्र आपण एकच संक्रांत मानतो. संक्रांतीच्या दिवशी दान देणाऱ्याला सूर्य अनेक पटीने पुन्हा परत करत असतो असे मानतात.
वैदिक पंचांगानुसार मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी सूर्य देव सकाळी 9.03 वाजता मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारी 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. मकर संक्रांतीची पूजा, स्नान, दान इत्यादी शुभ कार्ये शुभ काळात करण्यात येतात. 14 जानेवारी रोजी पुण्यकाल सकाळी 09:03 ते संध्याकाळी 05:46 पर्यंत असणार आहे. तर या दिवशी, महा पुण्यकाळ सकाळी 09:03 ते 10:48 पर्यंत असणार आहे.
19 वर्षांनंतर एक दुर्मिळ भौम पुष्य योग मकर संक्रांतीच्या दिवशी तयार होत आहे. मंगळवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येते तेव्हा भौम पुष्य नक्षत्र येते. मंगळाला पृथ्वी असेही म्हणतात. मकर संक्रांतीच्या निमित्ताने सकाळी 10.17 पासून भौम पुष्य योग दिवसभर राहील. अशा स्थिती तुम्ही 10.17 पासून दिवसभर सुगड पूजा करु शकणार आहात.
1. काळे तीळ, गूळ किंवा काळ्या तिळाचे लाडू
2. तांदूळ, डाळी, भाज्या किंवा खिचडी, तीळ, तिळाचे लाडू, गूळ इत्यादी दान करा.
3. गाईचे तूप, सप्तध्याय म्हणजे 7 प्रकारचे धान्य किंवा गहू
4. तांब्याचे भांडे, लाल चंदन, लाल वस्त्र, लाल फुले आणि फळे
5. एक दिवा, धूप, कापूर, नैवेद्य, सुगंध इ.
6. सूर्य चालीसा, सूर्य ग्रंथ आरती आणि आदित्य हृदय स्तोत्र
मकर संक्रांतीला पवित्र नदीत स्नान करणं शुभ मानलं जातं. तुमच्या शहरात नदी नसल्यास घरात पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे. स्वच्छा कपडे घालून सूर्यदेवाची पूजा करावी. सूर्यदेवाला जल अर्पण करावे. शिवाय वाहत्या प्रवाहात तीळ अर्पण करणे शुभ मानलं जातं. यादिवशा सूर्य चालिसाचे पठण करावं. शिवाय या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्त होतं. महाराष्ट्रात यादिवशी महिला सुगड पूजा करण्यात येते.
खरं तर सुगड या शब्दाचा मूळ शब्द हा 'सुघट' असा आहे. शेती मालांनी भरलेला घटाला सुघट असं म्हणतात. काही काळानंतर या शब्दाला 'सुगड' (Sugad) असं संबोधलं जाऊ लागलं. आज प्रत्येक जण सुगड असाच त्याचा उल्लेख करतात. मकर संक्रांतीला तांबड्या आणि काळ्या रंगाचे छोटे माठ म्हणजे घट ज्यांना सुगड म्हटलं जातं. पूर्वीच्या काळात मातीचे घट नव्हेत अशावेळी घरातील लहान गडव्याने सुगड पूजा केली जात होती. पण आज मकर संक्रांती आली की बाजारात तुम्हाला सहज तांबड्या आणि काळ्या रंगाचे सुगड मिळतात. या सुगडमध्ये शेतातील धान्य भरुन त्याची पूजा केली जाते.
मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी मोठे काळे सुगड, त्याहून छोटे लाल किंवा तांबड्या रंगाचे सुगड हे पाच सुगड, हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या लोंब्या आणि फुलं, पाट किंवा चौरंग, लाल रंगाचा कपडा, दिवा, रांगोळी, तांदूळ किंवा गहू, तिळगूळ-लाडू तयार करा.
सुगड पूजा ठिकाण स्वच्छ करुन तिथे पाट किंवा चौरंग मांडा. त्याभोवती सुंदर रांगोळी रेखाटा. चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र घालून त्यावर पाच ठिकाणी मुठीभर तांदूळ किंवा गहू घाला. आता पाच सुगडला पाच ठिकाणी उभं हळदी कुंकू उभे लावून ते गहू किंवा तांदळावर ठेवा. त्यानंतर सुगडमध्ये एकएक करुन हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरे, तीळगूळ, हळद-कुंकू, गव्हाच्या ओंब्या टाका. काळ्या रंगाचं मोठं सुगड खाली त्यावर लाल रंगाचं सुगड अशी त्याची मांडणी करा. सुगडावर अक्षता, फुलं, हळद, कुंकू वाहून धूप, दीप लावून पूजा करा. सुगड पूजेला तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवा. काही ठिकाणी हे सुगड महिला नंतर पाच जणींना वाण म्हणून देतात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)