सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : रमजानचा (Ramadan Eid) महिना सुरु झाल्याने खर्चासाठी पैसे देण्यास नकार दिल्यावरून पत्नीने पतीच्या पोटात, छातीवर वार करुन त्याला जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उस्मान अमीर खान (वय 71, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सून नाझमीन इम्रान खान (43) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत इम्रान खान हा जखमी झाला आहे. पत्नीने पतीवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या सर्व प्रकारानंतर पतीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पत्नीविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची सून नाझमीन हिने तिचा पती इम्रान याच्याकडे रमजान ईद सणानिमित्त घरखर्चाकरत पैसे मागितले होते. इम्रानने पैसे देण्यास नकार दिला. यावरुन दोघांमध्ये जोरदार वाद झाला. दरम्यान नाझमीनने रागाचे भरात हातील चाकूने इम्रान याच्या छाती व पोटावर सपासप वार केले आणि त्याला गंभीर जखमी केले.
या प्रकारानंतर इम्रानच्या वडिलांनी थेट कोंढवा पोलीस ठाणे गाठत सुनेविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. तर उपचारांसाठी इम्रानला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक वगरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
भररस्त्यात सरपंचाची हत्या
पुण्याच्या मावळमध्ये शनिवारी राष्ट्रवादीच्या विद्यमान सरपंचाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. मावळ तालुक्यातील प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची अज्ञातांनी कोयत्याने वार करत हत्या केली. तीन अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत गोपाळे यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात प्रवीण गोपाळे यांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री साईबाबा मंदिरात प्रवीण गोपाळे आले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी धारदार कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर जीव वाचवण्यासाठी प्रवीण गोपाळे यांनी पळ काढला होता. मात्र आरोपींनी गोपाळे यांचा पाठलाग करत त्यांना गाठले आणि त्यांच्यावर पुन्हा वार करत हत्या केली.
प्रवीण गोपाळे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले होते. या सर्व प्रकारानंतर प्रवीण गोपाळे यांचा भाऊ रवींद्र गोपाळे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. चौघांनाही सहा एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.