Maharashtra Weather News : राज्याच्या वेशीवरून पुढे गेलेल्या फेंगल चक्रीवादळानं महाराष्ट्रासह देशातील हवामानावरही असा काही परिणाम केला की, राज्यातून थंडीनं काढता पाय घेतला. चक्रीवादळानंतर निर्माण झालेल्या प्रणालीमुळं राज्यातील तापमानाच वाढ झाली असून, काही भागांवर पावसाळी ढगांची दाटी पाहायला मिळाली. दरम्यान नाशिक, सातारा, पुण्यातील काही भागांसह कोकणातील काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली.
मुंबई शहर आणि उपनगरातही हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यामुळं उष्मा अधिक भासत असून, इथंही थंडीनं काढता पाय घेतल्याचं लक्षात येत आहे. राज्यातील किनारपट्टी क्षेत्रामध्येही तापमानवाढ झाल्यामुळं उत्तर महाराष्ट्रातील काही भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात थंडीचं पुनरागमन इतक्यात दृष्टीक्षेपात दिसत नाहीय.
मुंबईत थंडीचा जोर ओसरला असला तरी सकाळच्या वेळी धुक्याची चादर शहरावर राही आणि दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नगरच्या काही भागांमध्ये गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण होते आणि वातावरणातही थंडी गायब होऊन उष्णता वाढली होती. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज पावसाने हजेरी लावली आहे.
पुढील 24 तासांचा अंदाज घ्यायचा झाल्यास राज्याच्या सांगली, सातारा आणि कोल्हापूर या पश्चिम क्षेत्राला वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. इथं पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्येही पावसाच्या हलक्या सरींची हजेरी पाहायला मिळेल असं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.
चक्रीवादळाचा प्रभाव ओसरत असल्यामुळं आता उत्तर भारत आणि हिमालय पर्वतीय क्षेत्रांवर पश्चिमी झंझावात सक्रीय होत असल्यामुळं 8 डिसेंबरनंतर या भागामध्ये हवामानात बदल होत जाणार असून, हिमाचल आणि काश्मीरच्या पर्वतरांगांमध्ये तापमानात घट होणार आहे. तर, पंजाब, हिमाचल, हरियाणा या मैदानी क्षेत्रांमध्ये पावसाच्या तुरळक सरींची हजेरी असेल असा इशारा देण्यात आला असून. पूर्वोत्तर भारतामध्ये पावसासह थंडीसाठीसुद्धा पूरक वातावरण तयार होत असल्यामुळं इथंही वातावरणाच्या वेगवेळ्या स्थिती पाहायला मिळणार आहेत.