Saif Ali khan Attack Kareena Kapoor Statement: अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याच्या घटनेला 48 तासांहून अधिकचा कालावधी उलटूनही आरोपी मोकाट फिरतोय. सैफ अली खानवर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु असतानाच या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलीस वेगवेगळ्या लोकांचा जबाब नोंदवत आहेत. याचदरम्यान सैफची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूरचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. विशेष म्हणजे करीनाच्या जबाबामधून एक वेगळीच गोष्ट समोर आली असून प्राथमिक अंदाजानुसार चोरीच्या उद्देशाने हल्लेखोर सैफच्या घरात घुसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत होतं. मात्र करीनाचा जबाब काहीतरी वेगळचं सूचित करतोय.
सैफवर झालेल्या हल्ला प्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत 40 ते 50 जणांची चौकशी केली आहे. हल्ला झाला तेव्हा घरात असलेल्या कर्मचाऱ्यांपासून ते सैफला रुग्णालयात घेऊन गेलेल्या रिक्षाचालकापर्यंत अनेकांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. यामध्ये करीनाचाही समावेश असून तिने आपल्या जबाबामध्ये नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. चोर घरात शिरल्याचे पाहिल्यानंतर नर्सनं आरडाओरड केली त्यानंतर सैफ आणि मी मुलांच्या खोलीच्या दिशेने धाव घेतली, असं करीनाने पोलिसांना सांगितलं. त्या व्यक्तीला जहांगीरवर हल्ला करायला आला होता असं मला वाटलं कारण हल्लेखोर त्याच्या खोलीत होता, असंही करीनाने पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबात म्हटलं आहे.
"चोर घरात असताना त्याने कोणत्याही मौल्यवान वस्तूंना किंवा दागिन्यांना हात लावला नाही. त्या वस्तू त्याने चोरल्या नाहीत. आरोपीने घरात चाकूचा धाक दाखवून नर्स लिमाकडे एक कोटीची मागणी केली," असं करीनाने जबाबात म्हटल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. अज्ञात व्यक्ती घरात चाकू घेऊन फिरत असल्याचे पाहिल्यानंतर करीना घाबरली होती, असं तिच्या जबाबामधून स्पष्ट होत आहे. हल्लेखोराने घरातील कुठलीही वस्तू चोरली नाही, असं करीनाने जबाबात सांगितलं. घरातील कपाटामध्ये ज्वेलरी तशीच होती, असंही करीना म्हणाली.
सैफ अली खानवर या व्यक्तीने हल्ला केल्यानंतर घरातील नर्स आणि करीनाने मदतीसाठी आरडाओरड केली, असंही सांगितलं. या घटनेने मानसिक तणावात असलेल्या करीनाला घटनेनंतर बहीण करिष्माने तिच्या घरी नेलं. दरम्यान, त्यापूर्वी रात्री जखमी अवस्थेत सैफला रुग्णालयात नेण्यासाठी कार उपलब्ध नसल्याने रिक्षाने त्याला 2 ते अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या लिलावती रुग्णालयात नेण्यात आलं.
अनेक कलाकारांनी करिष्माच्या घरी जाऊन करीनाची भेट घेतली. यामध्ये अभिनेता संजय दत्तपासून अनेक निकटवर्तीयांचा समावेश आहे. दुसरीकडे सैफची कन्या सारा अली खान, रितेश देशमुख यासारख्या कलाकारांनी लिलावतीमध्ये जाऊन सैफची भेट घेतली आहे.
वांद्रे पोलिसांनी सैफ आली खान याच्या घरी सुतारकाम करणाऱ्या कामगारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कालच पोलिसांनी सैफच्या इमारतीमध्ये फ्लोअर पॉलिशिंगचं काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचीही या प्रकरणामध्ये चौकशी केली. त्याचप्रमाणे पोलिसांनी सैफला लिलावती रुग्णालयात घेऊन गेलेल्या रिक्षा चालकाचाही जबाब नोंदवून घेतला. सैफ अली खान हल्लाप्रकरणी अजूनही कोणाला अटक करण्यात आलेली नाही अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.