'लाडकी बहीण' योजनेचे पैसे परत घेणार? परत आलेल्या 4 हजार अर्जांविषयी काय म्हणाल्या आदिती तटकरे?

Ladki Bahin news : राज्यात सुरु करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली...   

सायली पाटील | Updated: Jan 18, 2025, 11:52 AM IST
'लाडकी बहीण' योजनेचे पैसे परत घेणार? परत आलेल्या 4 हजार अर्जांविषयी काय म्हणाल्या आदिती तटकरे?  title=
WCD Minister Aditi Tatkare on Ladki Bahin scheme beneficiaries complaints latest updates

Ladki Bahin News : विधानसभा निवडणुकीमध्ये 'गेम चेंजर' ठरलेल्या 'लाडकी बहीण' या योजनेचा जवळपास अडीच कोटी महिलांनी लाभ घेतला. पण, यामध्ये नियमांची पायमल्ली करत उत्पन्नमर्यादा अधिक असतानाही काही महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. विरोधकांनी या योजनेवर सडकून टीका केली. ज्यानंतर आता प्रशासनानं यामध्ये लक्ष घालत अर्जांची पुन:पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर आतापर्यंत जवळपास 4 ते साडेचार हजार महिलांनी योजनेतून माघार घेतल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली. 

शनिवारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या योजनेसंदर्भात काही गोष्टी स्पष्ट केल्या. पात्रता निकषात न बसणाऱ्या महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यासाठीची पडताळणी मोहीम राबवण्याच्या आधीच राज्यभरातून चार हजारांहून अधिक महिलांनी ‘योजना नको’ असा अर्ज केला आहे. महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालयांत योजनेचे लाभ थांबवण्याची विनंती करणारे अर्ज येत आहेत. 

आदिती तटकरे काय म्हणाल्या? 

'आम्ही दिलेल्या माहितीनुसार पाच बाबींवर लाडकी बहीण योजनेसाठीच्या अर्जांची पुन:पडताळणी सुरू आहे. जिथं अडीच लाखांहून अधिक कोणाचं उत्पन्न आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, त्यांच्या तक्रारी आल्या आहेत किंवा दुचाकी वाहनांच्या पलिकडे ज्यांच्याकडे चार चाकी वाहनं आहेत त्यांच्यासंबंधीच्या तक्रारी आल्या होत्या. 

काही महिला लग्न होऊन इतर राज्यांमध्ये वास्तव्यास गेल्या आहेत अशा महिलांचे अर्जही आले आहेत की आम्ही लाभासाठी पात्र नाही. दोन वेळा अर्ज दाखल केल्याच्याही तक्रारी आल्या होत्या. त्यातील बऱ्याच महिलांनी स्वत:हून लाभ परत देण्यास सुरुवात केली आहे', असं म्हणत काही रक्कम डिसेंबर महिन्यात परत आली काही जानेवारी महिन्यात परत येत आहे असं तटकरे म्हणाल्या. सरकारी चलानच्या माध्यमातून ही संपूर्ण सरकारी प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. 

हेसुद्धा वाचा : कौतुक करावं तितकं कमी; मुकेश अंबानींच्या लेकीनं वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत रचला विक्रम 

योजनेतून पुढाकार घेत माघार घेणाऱ्या महिलांचे तटकरे यांनी आभारही मानले. लाभासाठी पात्र नसल्याचं लक्षात येताच पुढाकार घेत राज्य शासनाचा निधी परत करण्याची प्रामाणिक भूमिका लाडक्या बहिणींनी घेतली आहे त्यामुळं बहिणी लाडक्या आणि प्रामाणिकसुद्धा आहेत, असं त्या म्हणाल्या. 

दरम्यान, 4000 महिलांनी अर्ज परत केला हा प्राथमिक आकडा असून कदाचित याहून अधिक अर्ज परत येतील असंही सांगत ही पुन:पडताळणीची प्रक्रिया सुरु राहणार असून, परिवहन विभाग, आयकर विभाग यांची या प्रक्रियेमध्ये मदत घेतल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी विरोधकांना उत्तर देत या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सरकारी चलनच्या माध्यमातून रिफंड हेडच्या मदतीनं हे पैसे राज्याच्या तिजोरीत परत येणार असून, ती रक्कम लोककल्याणकारी कामांसाठी वापरली जाईल असं आश्वासक वक्तव्यसुद्धा त्यांनी केलं. 

चुकीच्या पद्धतीनं अर्ज भरला पण, मान्य केला नाही त्यांचं काय? 

याबबात पूर्वीच माहिती दिल्याचं म्हणत उत्पन्नापलिकडे जाऊन ज्यांनी लाभ घेतला आहे याची तपासणी सध्या सुरू असल्याचं अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं. योजना सुरु झाली त्या कालावधीत ज्यांना सरकारी नोकरी मिळाली आहे याचीही पडताळणी सुरू असून आहे. एखाद्याला पात्र लाभापलिकडे रक्कम आली असेल तर महिलांनी पुढाकार घेऊन अर्ज मागे घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.  

सरकारकडून केल्या जाणाऱ्या या  पुन:पडताळणी  प्रक्रियेमध्ये 'लाडकी बहीण' योजनेत नियमबाह्य पैसे घेतले असल्यास त्यांना त्यासंदर्भात माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीत तो पैसा परत घेतला जाईल, असं त्या म्हणाल्या. यामध्ये सर्व अडीच कोटी लाभार्थी महिला लाभार्थ्यांची पूर्णपणे पुन:पडताळणी करणार नसल्याचं स्पष्ट करत मुळात एक लाखांहून कमी उत्पन्न असणाऱ्या जवळपास दीड कोटींहून अधिक जनतेचाही यामध्ये समावेश असल्यामुळं इथं पुन:पडताळणीचा मुद्दा उपस्थित होतच नाही, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.