Women Ask DCM Eknath Shinde About Ladki Bahin Yojana: विधानसभा निवडणुकीमध्ये ऐतिहासिक बहुमत मिळाल्यानंतर निकालाला 12 दिवस उलटून गेल्यावर गुरुवारी नव्या सरकारच्या तीन प्रमुख मंत्र्यांनी शपथ घेतली. भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर शिवसेनेचे एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या अजित पवारांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आझाद मैदानावर पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांबरोबरच भाजपाशासित राज्यांमधील अनेक मुख्यमंत्र्यांनी आवर्जून हजेरी लावली.
महायुतीला मिळालेल्या या मोठ्या विजयामध्ये 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा मोठा वाटा असल्याचं निकालानंतर फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांनी अनेकदा म्हटलं आहे. अनेकदा या तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्रातील महिलांनी महायुतीच्या बाजूने कौल दिल्याबद्दल जाहीर आभार मानले आहेत. मात्र गुरुवारच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या एकनाथ शिंदेंना लाडक्या बहिणींनी शपथविधी सोहळ्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये एकनाथ शिंदेंना या योजनेची आठवण करुन दिल्याचं पाहायला मिळालं.
झालं असं की, शपथविधी सोहळा आटोपल्यानंतर एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी आलेल्या काही महिला समर्थकांची त्यांनी भेट घेतली. यावेळेस शिंदेंबरोबर दादा भुसे आणि इतरही काही पदाधिकारी होते. एकनाथ शिंदे आले तेव्हा या महिला एकाच वेळी आपलं म्हणणं सांगू लागल्या. त्याचवेळी एका महिलेने एकनाथ शिंदेंचा 'शिंदे दादा' असा उल्लेख करत त्यांना लाडकी बहीण योजनेवरुन प्रश्न विचारला. शिंदे दादा आमचा डिसेंबरचा हफ्ता कधी देणार? असा प्रश्न या महिलेने विचारला. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर सुरु केलेल्या या योजनेमध्ये प्रती महिना 1500 रुपये महिलांना दिले जातात. ही रक्कम वाढवून 2100 रुपये करणार असं आश्वासन महायुतीने प्रचारादरम्यान केलं होतं. त्यावरुनही एकनाथ शिंदेंना, '1500 देणार की 2100 रुपये देणार?' असा सवाल लाडक्या बहिणींनी एकनाथ शिंदेंना विचारला. त्यावर एकनाथ शिंदेंनीही मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिल्याचं पहायला मिळालं.
नक्की वाचा >> '..तरीही फडणवीसांचे अभिनंदन'; ठाकरेंच्या शिवसेनेच्या कानपिचक्या! म्हणाले, 'फडणवीस जातीयवादी व सुडाने..'
"शिंदे दादा माझा प्रश्न तोच आहे, आमचा डिसेंबरचा हफ्ता कधी येणार?" असा प्रश्न महिलेने विचारला. हे ऐकताच एकनाथ शिंदेंनी हसत त्यांच्यासमोर हात जोडले. पुढे बोलताना या महिलेने, "1500 की 2100 रुपये येणार?" असा सवाल विचारला. तसेच आपण छत्रपती संभाजीनगरवरुन आल्याचंही या महिलांनी एकनाथ शिंदेंना सांगितलं. इतरही महिला प्रश्न विचारु लागल्यानंतर एकनाथ शिंदेंनी, "लाडक्या बहिणींना बरोबर सगळं काही मिळणार आहे," असं उत्तर दिलं.