Mumbai Coastal Road Connects To Bandra Worli Sea Link : मुंबईकरांना प्रजासत्ताक दिनाचं गिफ्ट मिळालंय. कोस्टल रोड आणि वरळी-वांद्रे सी लिंकला जोडणा-या पुलाचं लोकार्पण आज करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोस्टल रोड प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या पुलामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास आता 15 मिनिटांत शक्य होणार आहे. 27 जानेवारी 2025 पासून या सर्व मार्गिंकावरून प्रत्यक्ष वाहतूक सुरू होणार आहे. तसेच मुंबई किनारी रस्ता दररोज सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत खुला राहणार आहे.
लोकार्पण कार्यक्रमापूर्वी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.तसंच मुख्यमंत्र्यांनी स्वत: गाडी चालवत या प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत गाडीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री आशिष शेलारही बसले होते. या पुलामुळे वाहतुकीवर ताण कमी होण्यास मदत होणारेय. पुलाचं लोकार्पण जरी आज झालं असलं तरीही मुंबईकरांना या पुलावरून वाहतूक ही उद्यापासून सुरू होणार आहे.
मुंबईच्या दक्षिण टोकापासून ते उत्तर मुंबईच्या टोकापर्यंत, म्हणजे नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई किनारी रस्ता प्रकल्प टप्प्या-टप्प्याने बांधण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यांतर्गत शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतचा धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची लांबी 10.58 किलोमीटर इतकी आहे. आजपर्यंत प्रकल्पाची 94 टक्के बांधणी पूर्ण झाली आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावरून 12 मार्च 2024 ते 31 डिसेंबर 2024 अखेरपर्यंत 50 लाख वाहनांनी ये-जा केली आहे. तसेच या मार्गावरून दररोज सरासरी 18 ते 20 हजार वाहनांचा प्रवास सुरू असतो.
या प्रकल्पातील दक्षिण मुंबईकडून उत्तर मुंबईकडे जाणारी वाहतूक वरळी-वांद्रे सेतूला जोडण्यासाठी दोन पूल बांधण्यात आले आहेत. त्यातील दक्षिणेकडे येण्यासाठी बांधलेल्या पहिल्या पुलाचे लोकार्पण दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी झाले. वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी या दक्षिण वाहिनी पुलावरून उत्तरेकडे (वांद्रेकडे) जाणाऱ्या वाहतुकीला मुभा देण्यात आली होती. आता उत्तर वाहिनी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या दोन्ही पुलावरून नियमित दिशांकडे वाहतूक सुरू होणार आहे.
कोस्टल रोड आणि वरळी-वांद्रे सी लिंकला जोडणा-या पुलाची लांबी 827 मीटर इतकी आहे. यामध्ये समुद्रावर असलेली लांबी 699 मीटर तर पोहोच रस्ता 128 मीटर यांचा समावेश आहे. हा पूल बांधण्यासाठी सुमारे 2400 मेट्रिक टन वजनाची तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) स्थापन करण्यात आला होता. या तुळईची लांबी 143 मीटर तर रुंदी 27 मीटर आणि उंची 31 मीटर इतकी आहे.
एकूण 10.58 किलोमीटर लांब असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पात भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते यांचा समावेश आहे. तसेच अमरसन्स, हाजी अली व वरळी येथे आंतरमार्गिका अर्थात इंटरचेंज आहेत. तसेच प्रत्येकी किलोमीटर लांबीचे दोन स्वतंत्र भूमिगत जुळे बोगदे करण्यात आले आहेत. या बोगद्यात सहा व इतर ठिकाणी ८ मार्गिका आहेत. या बोगद्यांना तब्बल ३७५ मिमी जाड काँक्रिटचे अस्तर आहे. या बोगद्यांमध्ये भारतात प्रथमच वापरात येत असलेली अत्याधुनिक सकार्डो ही वायुवीजन प्रणाली आहे. आपत्कालीन उपाययोजना म्हणून दोन्ही बोगद्यांना जोडणारे एकंदर १० छेद बोगदे देखील आहेत. तसेच या प्रकल्पातून ७० हेक्टर हरितक्षेत्र निर्मिती केली जात आहे.