'मागील 4 वर्षांपासून..', संभाजीराजे, उदयराजेंनी 'छावा'वर आक्षेप घेतल्याचं ऐकताच उतेकर म्हणाले, 'कळकळीची..'

Chhaava Director Laxman Utekar On Sambhaji Raje Udayanraje Bhosale: छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला संभाजीराजे आणि उदयनाराजेंनी विरोध केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 27, 2025, 01:09 PM IST
'मागील 4 वर्षांपासून..', संभाजीराजे, उदयराजेंनी 'छावा'वर आक्षेप घेतल्याचं ऐकताच उतेकर म्हणाले, 'कळकळीची..' title=
उतेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलं उत्तर

Chhaava Director Laxman Utekar On Sambhaji Raje Udayanraje Bhosale: छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित 'छावा' चित्रपटाच्या ट्रेलरवरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची तर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंधानाने येसूबाईंची भूमिका साकारलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर समोर आल्यानंतर अनेक शिवप्रेमींनी त्यावर आक्षेप घेतला आहे. ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि येसूबाई यांना नाचताना दाखवण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन टीकेची झोड उठलेली असतानाच चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उतकेरांना 'छावा'च्या ट्रेलरवर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपतींचे वासर असलेल्या उदयनराजेंनी आक्षेप घेतल्यावरुन प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उतेकरांनी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. 

छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजेंच्या प्रश्नावर काय म्हणाले उतेकर?

राज ठाकरेंकडून मार्गदर्शन घेण्यासाठी आपण गेलो होतो, असं प्रसारमाध्यमांना सांगितल्यानंतर उतेकरांना पत्रकारांनी या चित्रपटावर घेण्यात येणाऱ्या आक्षेपावर प्रश्न विचारण्यात आला. "हिंदीत छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट येतोय. जगाला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कळणार आहे.  छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजेंचं म्हणणं आहे की काही इतिहासकारांबरोबर आपण चर्चा करायला हवी किंवा स्क्रीनिंग ठेवायला हवं," असं म्हणत पत्रकाराने प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना उतेकरांनी, "आम्ही चर्चा करणार आहोत आणि स्पेशल स्क्रिनिंगही ठेवणार आहोत," असं सांगितलं.

चित्रपटाचा उद्देश काय हे ही सांगितलं

पुढे बोलताना उतेकरांनी, "हा चित्रपट बनवण्याचा मागचा उद्देश लक्षात घेतला पाहिजे, अशी माझी कळकळीची विनंती आहे. मागील चार वर्षांपासून संपूर्ण टीम या चित्रपटावर काम आणि रिसर्च करत आहे. एवढा मोठा सिनेमा बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण जगाला कळू दे. ते किती मोठे राजे होते. ते किती मोठे योद्धे होते हे जगाला कळायला हवे. पण (ट्रेलरमध्ये दिसणाऱ्या लेझिम डान्ससारख्या) एक दोन गोष्टी त्याला असं गालबोट लावत असतील तर त्या डिलिट करायला आम्हाला काही हरकत नाही," असंही म्हटलं आहे.

नक्की वाचा >> 'संभाजी महाराज नाचले नसतील असं वाटत असेल तर...'; राज ठाकरेंच्या भेटीनंतर उतेकरांची मोठी घोषणा

स्पेशल स्क्रिनिंगची घोषणा

छत्रपती संभाजीराजेंसाठी 'छावा'चे निर्माते असलेल्या मॅडॉक कंपनीकडून पडताळणीसाठी विशेष शोचे आयोजन करण्यात आलं आहे. 'छावा' चित्रपटाच्या ट्रेलरवरुन उठलेल्या वादंगामुळे चित्रपट निर्मात्यांनी युवराज संभाजीराजे छत्रपती व इतिहास अभ्यासकांसाठी खास शोचे आयोजन केले आहे. 29 जानेवारी रोजी मुंबईमध्ये या खास शोचे आयोजन करण्यात आले आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.