Shocking News : आजकाल लग्न होत नसल्याने अनेक तरुण चिंतेत असल्याचे पाहायला मिळत आहेत. मात्र काहीवेळा लग्न झालं तरी फसवणूकीचे प्रकार समोर आल्याचे पाहायला मिळतात. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh News) पाहायला मिळाला आहे. उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात एका लग्नाने (marriage) सगळ्यांना धक्का बसला आहे. लग्नानंतर सासरच्या मंडळींना हकीकत कळल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. लग्नानंतर नवरदेवाला नक्की काय झालंय हेच कळेना. कारण ज्या मुलीसोबत लग्न ठरवण्यात आले होते त्याऐवजी दुसऱ्याच मुलीसोबत लग्न लावण्यात आले.
संभळ जिल्ह्यातील एका गावात ही वरात घरी आल्यानंतर सासरच्यांनी वधूला गाडीतून उतरवून घरात प्रवेश केला. घरातील महिलांनी सुनेचा पदर उचलताच त्यांना धक्काच बसला. नवरदेवानेही जेव्हा आपली वधू पाहिली तेव्हा तोही घाबरला आणि त्याने तिच्यासोबत संसार थाटण्यास नकार दिला आणि मी हिच्यासोबत राहण्यापेक्षा विष पिऊन जीव देईन अशी धमकी देऊ लागला आहे.
नेमकं काय घडलं?
संभळ जिल्ह्याच्या हजरतनगर गढी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कटौनी गावात हा सर्व प्रकार घडला. या गावातील एका तरुणाने लग्न करुन त्याच्या पत्नीला घरी आणले होते. घरातील महिला नवरीच्या स्वागतासाठी तयार होत्या. नातेवाईकांनाही नववधूचा चेहरा पाहायचा होता. घरातील लोकांनी वधूचा पदर उचलताच त्यांना धक्का बसला. कारण लग्नाआधी त्यांना दुसरी मुलगी दाखवण्यात आली होती. मात्र लग्न दुसऱ्या मुलीसोबत लावून देण्यात आले. यानंतर सासरच्यांनी मुलीचा तिच्या कुटुंबियांकडे परत आणून सोडले.
यावर तोडगा काढण्यासाठी पंचायत बोलवण्यात आली. दहा दिवस याच्यावर चर्चा सुरु होती मात्र कोणताही तोडगा निघाला नाही. मुलाच्या बाजूच्या लोकांनी सांगितले की, लग्नापूर्वी आम्हाला धाकटी मुलगी दाखवली होती पण मोठ्या मुलीचे लग्न लावून दिले होते. मुलाकडच्या लोकांनी मोठी मुलगी मानसिक आजाराने त्रस्त असल्याचा आरोप केला आहे. मुलाकडच्यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली. आता पोलीस या प्रकरणी तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत.