भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकत्याच झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border Gavaskar Trophy) भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतने (Rishabh Pant) 28.33 च्या सरासरीने 255 धावा केल्या होत्या. पण मालिकेतील मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात ज्याप्रकारे ऋषभ पंत बाद झाला होता, त्यावरुन त्याच्यावर फार टीका झाली होती. स्कॉट बोलँडच्या गोलंदाजीवर स्कूप शॉट खेळण्याच्या नादात ऋषभ पंत बाद झाला होता. मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 474 धावांच्या आव्हानाचा सामना करताना भारताची स्थिती 5 बाद 195 अशी होती. त्यामुळे ऋषभ पंतने बेजबादार शॉट खेळल्याने दिग्गज सुनील गावस्कर यांनी हा मूर्खपणा असल्याचं म्हटलं होतं.
सिडनी कसोटी मालिकेच्या दुसऱ्या डावात सर्व फलंदाज अपयशी ठरत असताना ऋषभ पंतने 40 धावांची खेळी केली होती. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज आर अश्विनने पंतच्या बचावात्मक खेळीचं कौतुक केलं आहे. जर कोणी पंत बचाव करताना 10 वेळा बाद होताना दाखवू शकले तर मी नाव बदलेन असं जाहीर आव्हानच दिलं आहे.
"आपण हे लक्षात घेतले पाहिजे की ऋषभ पंत बचाव करताना क्वचितच बाद होतो. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम बचावात्मक खेळी करणाऱ्या खेळाडूंपैकी तो एक आहे. बचाव हा एक आव्हानात्मक पैलू बनला आहे, त्याच्याकडे सर्वोत्तम बचाव आहे. जर कोणी मला पंतला 10 वेळा बचाव करताना बाद होताना दाखवले तर मी माझं नाव बदलेन," असं अश्विनने त्याच्या युट्यूब चॅनलवर म्हटलं आहे.
मेलबर्न कसोटी सामन्यात ऋषभ पंत बाद झाल्यानंतर सुनील गावसकर यांनी संताप व्यक्त केला होता. मात्र नंतर ज्याप्रकारे त्याने बचावात्मक खेळी केली ते पाहता कौतुक केलं. ऋषभ पंतने सिडनी कसोटीत 61 चेंडूत 40 धावा केल्या. तसंच पहिल्या डावात 98 चेंडूत 40 धावा करताना चेंडू अनेकदा त्याच्या शरिरावर आदळला होता.
आर अश्विननेही पंतच्या प्रयत्नांचं कौतुक केलं. "कसोटी क्रिकेट कधीच सोपे नसते आणि तुम्हाला तिथे लढा द्यावा लागतो. त्याने सिडनीमध्ये दोन वेगवेगळ्या खेळी केल्या. पहिल्या डावात त्याने 40 धावा केल्या आणि त्याला सगळीकडे चेंडू लागला. ही त्याची सर्वात कमी चर्चा झालेली खेळी होती आणि हे अन्यायकारक आहे. दुसऱ्या डावात त्याने एक सनसनाटी अर्धशतक झळकावले आणि सर्वांनी त्याचे कौतुक केले. पहिल्या डावात त्याने काय केले हे सर्वजण विसरून गेले आणि त्याच्या दुसऱ्या खेळीसाठी त्याचे कौतुक केले," अशी खंत अश्विनने व्यक्त केली.
संघ व्यवस्थापनाने पंतला त्याच्याकडून संघासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी सांगण्याची गरज आहे असंही मत अश्विनने मांडलं आहे. "जर त्याला चांगली किंवा एखाद्या हेतूने फलंदाजी करायची असेल तर त्याने काय करावे हे आपण त्याला योग्यरित्या सांगितले पाहिजे. त्याने जास्त धावा केल्या नाहीत, परंतु तो धावा न करणाऱ्या खेळाडूसारखा खेळला नाही. त्याच्या हातात बराच वेळ आहे. ऋषभ पंतला अद्याप त्याची पूर्ण क्षमता जाणवलेली नाही," असं अश्विन म्हणाला