MSRTC ST Bus Live Location: तुमची एसटी कुठपर्यंत पोहोचली आहे? हे आता तुम्हाला लाइव्ह लोकेशनद्वारे कळणार आहे. रेल्वे, खासगी वाहतूकदारांप्रमाणे आता राज्य परिवहन सेवेची म्हणजेच एसटीची बस कुठे आहे ते प्रवाशांना आपल्या मोबाईलवर कळणार आहे. एसटी महामंडळाने तयार केलेल्या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना लालपरीचे लोकेशन मोबाइलवर कळणार आहे. एसटी तिकिटावर असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस स्टॅन्डवर येण्याची वेळ समजणार आहे.
गावागावात लालपरीला जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. पण लालपरीच्या फेऱ्या मर्यादित असल्यामुळं प्रवाशांना बस कधी येणार हे मात्र माहित नसते. अनेकदा प्रवाशांना बससाठी तासनतास ताटकळत बसावे लागते. मात्र आता एसटीच्या ताफ्यातील सर्वच गाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम (व्हीएलटी) बसविले जाणार असल्याने एसटीच्या अॅपवर बसची माहिती उपलब्ध होणार आहे.
राज्यभरात ५० हजार मार्गावर एसटीच्या सव्वालाख फेऱ्या होत असतात. यात लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आगाऊ तिकीट काढूनही बस नेमकी कोणत्या ठिकाणी आली, मधल्या थांब्यावर एसटी नेमकी कधी येणार याची माहिती मिळत नाही. यासाठी महामंडळाने तयार केलेल्या व्हीएलटीच्या मदतीने बस थांबे व त्यांच्या निवडलेल्या स्थानकात ती येण्याचा अपेक्षित वेळ २४ तास आधी समजणार आहे.रोस मार्टा कंपनीने रूट मॅपिंग पूर्ण केले असून त्याचे सिस्टिममध्ये इंटिग्रेशनही पूर्ण झाले आहे. सध्या वार्षिक ऑपरेशनल पॅटर्नमधील बदल त्यामध्ये इंटिग्रेट करणे सुरू असून येत्या काही आठवड्यांत हे काम पूर्ण होणार आहे.
एसटीच्या प्रवाशांनी काढलेल्या तिकिटावर असलेला ट्रिप कोड एसटीच्या अॅप्लिकेशनमध्ये ट्रॅक बसवर टाकल्यावर तिचे लोकेशन समजणार आहे. त्यामध्ये इतर मार्गावरील गाड्या, त्यांची वेळ, त्या सर्व गाड्यांचे थांबे हे देखील समजणार आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एसटीच्या मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात अद्ययावत नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. याद्वारे राज्यभरातील एसटीवर नियंत्रण ठेवण्यात येणार होते.