Beed Crime: परळीच्या गुन्हेगारी साम्राज्याचा वाल्मिक कराड हा बेताज बादशाह असला तर त्याचे अनेक गुंड तिथले सरदार आहेत. वाल्मिकचा असाच एक साथीदार गोट्या गित्तेचा व्हिडिओ समोर आलाय. सीआयडीची टीम वाल्मिकला घेऊन बीडकडं निघाली असताना पोलिसांच्या ताफ्याचा पाठलाग गोट्या गित्ते करत होता. गंभीर गुन्हे असलेला गोट्या गित्ते अजून फरार का असा सवाल विचारला जातोय.
परळी तालुक्यातला वाल्मिक कराड हा एकटाच गुन्हेगार नाही... तर या बाहुबली नेत्याची कामं करणारी एक टोळीच असल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. वाल्मिक कराडच्या गोट्या गीत्ते नावाच्या एका साथीदाराचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. वाल्मिक कराडला 31 डिसेंबरला सीआयडी केज कोर्टात नेत असताना पोलिसांच्या ताफ्यामागं गोट्या गित्ते होता. गोट्या गित्तेचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. गोट्या गित्ते हा कोणी टपराट चोर नाही. तर गोट्या गित्ते हा कुख्यात गुन्हेगार आहे. याच गोट्या गित्तेकडं 40-40 कट्टे सापडले होते. एवढंच नाही तर त्यानं देहूतल्या तुकोबारायांच्या मंदिरातला मुखवटाही चोरला होता.
गोट्या गित्तेच्या गुन्ह्यांची कुंडली फार मोठी आहे. गोट्या गित्तेवर गेल्या पंधरा वर्षांपासून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.चो-या करणे, लोकांना धमकावणे, गावठी कट्टे बाळगणे, हत्या करणे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्याचं नाव आलं होतं.
परळीतल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोट्या गित्ते हा परळीतला गावठी कट्टे पुरवणारा मोठा गुंड आहे. गेल्या काही वर्षांपासून तो वाल्मिकच्या संपर्कात आहे. वाल्मिकच्या टोळीला तो शस्त्रं पुरवत असल्याचं सांगण्यात येतंय.काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी सरकारवर टीका केलीय. वाल्मिक कराडकडून सगळी माहिती काढायची म्हटलं तर एक महिना लागेल असंही वडेट्टीवार म्हणालेत.
वाल्मिकला अटक झाल्यापासून सोशल मीडियावर वाल्मिक कराडच्या दैवतीकरणाच्या रिल्सचा रतीब सुरु आहे. सध्या तरी गोट्या गित्ते हा एक मोहरा समोर आलाय. वाल्मिकच्या गुन्हेगारी साम्राज्यातील अनेक मोहरे परळीच्या गल्लीत फिरत असल्याची माहिती आहे.