इतकी वर्षे मला देशभक्ती सिद्ध करावी लागली नाही; अक्षय कुमारची खंत

गेल्या सात वर्षांमध्ये मी एकदाही कॅनडाला गेलेलो नाही.

Updated: May 3, 2019, 05:02 PM IST
इतकी वर्षे मला देशभक्ती सिद्ध करावी लागली नाही; अक्षय कुमारची खंत title=

मुंबई: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने शुक्रवारी त्याच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून उपस्थित करण्यात येणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. भारतात इतकी वर्षे राहूनही मला वारंवार अकारण वादात खेचले जाते. यामुळे मला खूपच दु:ख झाले आहे, असे अक्षय कुमारने सांगितले. 

अक्षय कुमारच्या नागरिकत्वाचा मुद्दा यापूर्वी अनेकदा चर्चेत आला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी अक्षयने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली होती. याशिवाय, अक्षय कुमारने लोकसभा निवडणुकीत मतदान न केल्याचाही मुद्दा अनेकांनी उपस्थित केला होता. 

या पार्श्वभूमीवर अक्षय कुमारने शुक्रवारी आपले मौन सोडले. त्याने म्हटले की, माझ्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून अकारण नकारात्मक वातावरण का निर्माण केले जाते, हे मला कळत नाही. माझ्याकडे कॅनडाचे पारपत्र असल्याची बाब मी कधीही लपवून ठेवलेली नाही. मात्र, गेल्या सात वर्षांमध्ये मी एकदाही कॅनडाला गेलेलो नाही. मी भारतातच काम करतो आणि करही भरतो. मात्र, आतापर्यंत मला कधीही कोणासमोर स्वत:ची देशभक्ती सिद्ध करावी लागली नाही. मात्र, नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून मला अकारण वादात खेचले जाते, ही खूपच दु:खदायक गोष्ट आहे. ही बाब पूर्णपणे वैयक्तिक, अराजकीय असून त्याचा इतर कोणाशीही संबंध नाही, असेही अक्षयने सांगितले. 

गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी यांच्या मुलाखतीमुळे अक्षय कुमार चांगलाच चर्चेत आहे. ही अनौपचारिक मुलाखत असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले होते. या मुलाखतीमध्ये अक्षय कुमारने मोदींना त्यांच्या खासगी आयुष्याविषयी अनेक प्रश्न विचारले होते. या प्रश्नांना मोदींनी दिलखुलासपणे उत्तरे दिली होती.