वाल्मिक कराडचा कोट्यवधीचा 'बार'नामा, कोणकोणत्या धंद्यात खंडणीचे पैसे?

Valmik Karad: परळीचा बाहुबली वाल्मिक कराडच्या एकाहून एक सुरस कहाण्या समोर येऊ लागल्यात. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 7, 2025, 09:03 PM IST
वाल्मिक कराडचा कोट्यवधीचा 'बार'नामा, कोणकोणत्या धंद्यात खंडणीचे पैसे? title=
वाल्मिक कराड

Valmik Karad: वाल्मिक कराडचे 4 ते 5 दारू दुकाने आहेत, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलीय. वाल्मिक कराडची  केज, वडवनी, बीड आणि परळीत 4 ते 5 दारूची दुकाने आहेत. प्रत्येक दुकानाचा बाजार भाव 5 कोटी असल्याचं दमानिया यांनी म्हंटलय. वाल्मिक कराडवर काय आरोप झालेयत? जाणून घेऊया. 

परळीचा बाहुबली वाल्मिक कराडच्या एकाहून एक सुरस कहाण्या समोर येऊ लागल्यात. वाल्मिक कराडनं खंडणी आणि गुंडगिरीतून गोळा केलेला पैसा दारुच्या धंद्यात गुंतवल्याची माहिती समोर आलीये. वाल्मिक कराडनं केज, वडवनी, बीड आणि परळीत दारुची दुकानं थाटल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केलाय. एका दुकानाची किंमत 4 ते 5 कोटी रुपये धरली तरी पाच दुकानांची मालकी म्हणजे जवळपास दहा ते बारा कोटी रुपये वाल्मिकनं दारुच्या धंद्यात गुंतवल्याचा आरोप करण्यात आलाय.

दारुच्या दुकानांमधली उलाढाल लाखोंच्या घरात असल्याचा दावाही दमानियांनी केलाय. वाल्मिक यांनी गुन्हेगारीतून कमावलेला पैसा पुन्हा दारु धंद्यातून दुप्पट तिप्पट केल्याचंही दमानियांचं म्हणणं आहे. बारसाठी त्यानं पावणे दोन कोटी रुपयांना जमीन खरेदी केली आणि त्या जमिनीवर त्यांना एका रात्रीत बारची परवानगीही मिळवल्याचा दावा त्यांनी केलाय. या संदर्भातली काही कागदपत्रही त्यांनी सादर केलीयेत. वाल्मिक कराडनं दारुच्या धंद्यात दहा ते बारा कोटी रुपये गुंतवले असतील तक त्यानं परळीत इतर कोणकोणत्या धंद्यात खंडणीचे पैसे गुंतवलेत याची चौकशी होणं गरजेचं आहे.

वाल्मिक कराड ईडीच्या रडारवर

वाल्मिक कराड हा परळीचा डॉन असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय. धनंजय मुंडेंच्या आशीर्वादामुळं वाल्मिक कराड परळी आणि बीडचा बेताज बादशहा बनल्याचंही सुरेश धस यांनी सांगितलंय. वाल्मिक कराडनं वेगवेगळ्या काळ्या धंद्यातून कोट्यावधीची माया गोळा केल्याचा दावा सुरेश धस यांनी केलाय. वाल्मिक कराडची रोजची कमाई दोन कोटी रुपयांची असल्याचा दावाही धस यांनी केलाय. वाल्मिक कराडला दोन महिन्यांपूर्वीच ईडीची नोटीस आल्याचा दावा धस यांनी केलाय. ईडीच्या नोटीशीचा पाठपुरावा करणार असल्याचंही सुरेश धसांनी सांगितलंय. वाल्मिक कराडला आलेल्या ईडीच्या नोटीशीबाबत धनंजय मुंडेंनी कानावर हात ठेवलेत. वाल्मिक कराडला आलेल्या नोटीशीबाबत काहीच माहिती नसल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलंय. वाल्मिक कराडला ईडीची नोटीस आली होती तर त्याचं पुढं काय झालं हे ईडीला विचारायला हवं असा टोला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लगावलाय. वाल्मिक कराड यानं कोट्यवधीची माया गोळा केली असेल तर त्यावर कारवाई व्हायलाच हवी. सुरेश धस यांचा दावा खरा मानला तर दोन महिन्यापूर्वी नोटीस पाठवून ईडी गप्प का बसली असा सवाल उपस्थित केला जातोय.