धनंजय मुंडेंच्या मुंबईतील सरकारी बंगल्यावर झाली पवनचक्की खंडणीची डील, सुरेश धस यांच्या दाव्यामुळे खळबळ

धनंजय मुंडेंच्या मुंबईतल्या सरकारी बंगल्यावर पवनचक्की खंडणीचं डील झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. 

शिवराज यादव | Updated: Jan 7, 2025, 08:55 PM IST
धनंजय मुंडेंच्या मुंबईतील सरकारी बंगल्यावर झाली पवनचक्की खंडणीची डील, सुरेश धस यांच्या दाव्यामुळे खळबळ title=

बीडच्या पवनचक्की खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड जेलमध्ये आहे. वाल्मिक कराड जेलमध्ये असतानाच पवनचक्की खंडणी प्रकरणात धनंजय मुंडेंचंही नाव आलं आहे. धनंजय मुंडेंच्या मुंबईतल्या सरकारी बंगल्यावर पवनचक्की खंडणीचं डील झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. परळी आणि मुंबईतल्या सातपुडा बंगल्यावर या बैठका झाल्याचा आरोप झाला आहे. एका मंत्र्यांच्या सरकारी बंगल्यावर खंडणीच्या वाटाघाडी झाल्याचा आरोप झाल्यानं मुंडे आणखी अडचणीत आले आहेत. 

'खंडणीसाठी मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर बैठक'

'सातपुडा बंगल्यावर पवनचक्की कंपनीशी खंडणीच्या वाटाघाटी'

सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर थेट आरोप

पवनचक्की खंडणी प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंवर भाजप आमदार सुरेश धस यांनी आरोपांचा बॉम्बगोळा टाकला आहे. धनंजय मुंडेंच्या साक्षीनं आबादा या पवनचक्की कंपनीशी खंडणीच्या वाटाघाटी झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. टू द पॉईंट या मुलाखतीत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले. पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी खंडणीसाठी परळीतल्या मुंडेंच्या निवासस्थानी पहिली बैठक झाली. त्यानंतर मुंबईत दुसरी बैठक झाली. या बैठकीला कोण कोण होतं याची यादीही सुरेश धस यांनी दिली  आहे.

सुरेश धस यांच्याकडं पुरावे असावेत त्यामुळंच त्यांनी आरोप केले असावेत असं बीडचे खासदार बजरंग सोनावणे म्हणाले आहेत. मंत्र्यांचे बंगले हे खंडणीखोरीचे अड्डे झालेत का असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी उपस्थित केला आहे. 

धनंजय मुंडे ज्या सरकारमध्ये मंत्री आहेत त्याच सरकारमध्ये सुरेश धस आहेत. सुरेश धस यांनी आपल्याच सरकारमधील एका मंत्र्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळं या आरोपांची चौकशी व्हावी अशी मागणी होऊ लागलीये.