भोपाळ: रामायण आणि महाभारत वाचल्यास हिंदू लोकही हिंसक होऊ शकतात, हे दिसून येते. मग उजव्या विचारसरणीच्या संघटना हिंसेचा संबंध विशिष्ट धर्माशीच का जोडतात, असा सवाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी उपस्थित केला. ते गुरुवारी भोपाळमधील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, रामायण आणि महाभारतामध्ये हिंसेचे आणि युद्धाचे अनेक प्रसंग आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांकडून वेळोवेळी या ग्रंथांमधील पराक्रमाचा दाखलाही दिला जातो. मग तरीही हिंदू लोक अहिंसक आहेत, असा दावा ते कसे करु शकतात? तसेच विशिष्ट धर्माचाच हिंसेशी संबंध आहे आणि हिंदू लोकांचा नाही, या दाव्यात कितपत तथ्य आहे, असा सवालही येचुरी यांनी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गोहत्याबंदीच्या नावाखाली स्वत:ची खासगी सेना उभारल्याची टीकाही यावेळी त्यांनी केली.
तसेच आगामी निवडणुकीत महाआघाडी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावरून दूर करेल. महाआघाडीकडे नरेंद्र मोदींसाठी पर्याय आहे. लोकसभा निवडणुकीतील तीन टप्प्यानंतर भाजपाला पराभवाचे संकेत मिळू लागले आहेत. या भीतीपोटीच भाजपाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली. साध्वी प्रज्ञा यांना रिंगणात उतरवून भाजपा मूळ मुद्द्यांवरुन लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा येचुरी यांनी केला.
भोपाळ मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंहदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. ही फक्त निवडणूक नसून संविधानाचे रक्षण करण्यासाठीची लढाई आहे. भाजप आणि संघ संविधानाला मानत नाही. त्यांना ही व्यवस्था मोडीत काढायची आहे. त्यामुळेच सरकारने महात्मा गांधी यांनाही केवळ स्वच्छ भारत अभियानापुरते मर्यादित ठेवले, असे दिग्विजय सिंह यांनी सांगितले.