Ankita Death Case: अंकिता हत्याकांडाने संपूर्ण देश हादरलाय. दुमका (Dumka) नगर पोलीस स्टेशन हद्दीतील जरुवाडीह परिसरात राहणाऱ्या शाहरुखने अंकितावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळलं. अंकिताने शाहरुखशी फोनवर बोलण्यास नकार दिल्यामुळेच तिच्यासोबत हा भयंकर प्रकार घडला. गंभीररित्या भाजलेल्या अंकिताला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर अंकिताची प्राणज्योत मालवली.
सलमानच्या बोलण्याला फसलं कुटुंब
23 ऑगस्टला ही भीषण घटना घडली. घटनेच्या पाच दिवस आधी आरोपी शाहरुखने अंकिताच्या घरी जाऊन गोंधळ घातला होता. त्याने हातातल्या काठीने घरातील खिडक्यांच्या काचांची तोडफोड केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पहाताच अंकिताच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार देण्याचं ठरवलं. पण त्याचवेळी तिथे पोहोचलेल्या शाहरुखचा मोठा भाऊ सलमानने अंकिताच्या कुटुंबियाना थांबवलं.
सलमानने पोलिसात तक्रार न करण्याची विनंती अंकिताच्या कुटुंबियांना केली. इतकंच नाही तर शाहरुखला दुमकातून बाहेर पाठवण्याचं आश्वासनही त्याने अंकिताच्या कुटुंबियांना दिलं. अंकिताचं कुटुंब सलमानच्या बोलण्याला फसलं. अंकिताच्या कुटुंबियांनी शाहरुखची तक्रार न करण्याचं ठरवलं.
पण हीच त्यांची मोठी चूक ठरली. अंकिताचे काका विनय सिंह यांनी सांगितलं, पोलिसात तक्रार न केल्याने शाहरुखची हिंमत आणखी वाढली. त्यानंतर पाच दिवसाने शाहरुख पुन्हा अंकिताच्या घरी गेला. त्याने आधी जी खिडकीची काच फोडली त्या खिडकीमधून त्याने घरात प्रवेश केला आणि अंकितावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं.
काय आहे नेमकी घटना?
झारखंडच्या दुमका इथं राहणारी अंकित सिंह हिची आरोपीने जिंवत जाळत हत्या केली. अंकिता 12 वीत शिकत होती. आरोपी शाहरुख अंकितावर एकतर्फी प्रेम करत होता. पण अंकिताने त्याला नकार दिला होता. त्यामुळे शाहरुख प्रचंड संतापला होता. बदला घेण्याच्या हेतूने 23 ऑगस्टला शाहरुखने आपल्या मित्रासोबत अंकिताचं घर गाठलं. झोपेत असलेल्या अंकितावर त्याने पेट्रोल टाकलं आणि आग लावली.
घटनेनंतर शाहरुखने तिथून पळ काढला. अंकिताच्या घरच्यांनी तात्काळ तिला दुमका इथल्या रुग्णलयात दाखल केलं. पण तिची गंभीर परिस्थिती पाहता तिला रांचीतल्या रिम्स रुग्णलयात दाखल करण्यात आलं. अंकिताने पाच दिवस मृत्यूशी झुंज दिली. पण अखेर तिचा दुर्देवी मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात अंकिताने शाहरुखचं नाव घेतलं. 'मी ज्या मरण यातना भोगल्या तशाच शाहरुखनेही भोगाव्यात' असे उद्गार तीने मृत्यूपूर्वी काढले होते.
या घटनेने संपूर्ण देश हादरला. झारखंडमध्ये अनेक ठिकाणी लोकांनी रस्त्यावर उतरुन या घटनेचा निषेध केलाय. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होतेय. आरोपी शाहरुख सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.