आग्रा : देशभरात उद्या 31 ऑगस्ट पासून गणेश चतुर्थीचा सण साजरा करण्यात येणार आहे. या सणानिमित्त देशभरात तयारी सुरु आहेत.कुठे गणपतीचं आगमन सुरु आहे, तर कुठे सजावटीचं काम सुरु आहे. तर बाजारात सुद्धा गणपतीचा आवडत्या खाद्यपदार्थांनी दुकाने सजली आहेत. अशात आता आग्र्यात सोन्याचा मोदक बनवण्यात आला आहे. त्यामुळे हा मोदक पाहण्याची अनेकांना उत्सुकता लागलीय. दरम्यान हा मोदक कसा बनवण्यात आलाय व या मोदकाची किंमत किती आहे ती जाणून घेऊयात.
आग्राच्या शाह मार्केट येथील ब्रिज रसायनम स्वीट्स भंडार प्रत्येक सणाला वेगवेगळ्या स्वीट्स डिशेस बनवत असते. त्यामुळे आता गणेश चतुर्थीनिमित्त त्यांनी सोन्याचा मोदक बनवला आहे. त्यामुळे हा मोदक ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. त्यामुळे काही लोक हातात लाडू घेऊन फोटो काढत आहेत, तर काहीजण खरेदी करून त्यांच्या घरी नेत आहेत.
ब्रिज रसायनम स्वीट्स भंडारचे मालक तुषार म्हणाले की, प्रत्येक सणाला लोकांना काहीतरी नवीन देण्याचा आमचा उद्देश आहे. त्यामुळे दिवाळीला सोन्याची मिठाई, रक्षाबंधनाला सोन्याचे घेवर बनवण्यात आले. ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.यावेळी गणेश चतुर्थीला आम्ही सोन्याचे मोदक बनवले आहेत. हे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण त्या वस्तूंचा वापर केला आहे, ज्या गणपतीला खूप प्रिय आहेत. त्यानंतर त्याचे लाडू बनवण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
असा बनवला मोदक
ब्रिज रसायनम स्वीट्स भंडारने सोन्याचे मोदक बनवले आहेत. या लाडूवर 24 कॅरेट सोन्याचा वर्ख लावण्यात आला आहे. तसेच या अनोख्या लाडूमध्ये मध, सुकी कोथिंबीर, बत्तासे, ड्रायफ्रुट्स, बुंदी यांचा वापर करण्यात आला आहे. त्यानंतर वरून लाडूंवर सोन्याचे वर्ख लावण्यात आले आहे.
किंमत किती?
तुषारने यांनी सांगितले की, शहरातील अनेक दुकानांमध्ये साधे मोदक लाडू मिळतील. पण सोन्याचे मोदक लाडू फक्त ब्रिज रसनायम येथेच मिळतात. हे करण्यासाठी आमच्या संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे. या सोन्याच्या मोदकाच्या लाडूची किंमत 500 रुपये, तर एक किलो लाडूची किंमत 16,500 रुपये आहे.
दरम्यान सोन्याच्या या मोदकाची एकचं चर्चा आहे. तसेच ग्राहक देखील हा मोदक खरेदी करायला तुफान गर्दी करत आहेत.