Coronavirus: लॉकडाऊनचा परिणाम; रुग्णांच्या संख्येत घट

लॉकडाऊनचा परिणाम दिसत असून नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची गती कमी झाल्याचं चित्र आहे. 

Updated: Mar 30, 2020, 09:34 AM IST
Coronavirus: लॉकडाऊनचा परिणाम; रुग्णांच्या संख्येत घट title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारकडून देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनचा परिणाम दिसत असून नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची गती कमी झाल्याचं चित्र आहे. कोरोना व्हायरसच्या अपडेटसाठी बनवण्यात आलेल्या covid19india.org या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांच्या वाढीची संख्या कमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या वेबसाईटनुसार, 21 मार्च रोजी देशात कोरोना व्हायरसची 283 प्रकरणं नोंदवली गेली होती. तर पुढच्याच दिवसांत ही संख्या वाढून 396 इतकी झाली. त्यामुळे या रुग्णांमध्ये 39.92 टक्क्यांची जलद वाढ नोंदवली गेली. परंतु 27 मार्च आणि 28 मार्च दरम्यान, कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याची नोंद झाली. ही नोंद 5.31 टक्के इतकी आहे.

या वेबसाईटनुसार, 22 मार्च रोजी देशात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 396वर पोहचली. दुसऱ्या दिवशी 23 मार्च रोजी ही संख्या 468 झाली. त्यानंतर रुग्णांची संख्या घटण्याचं प्रमाण 18.18 टक्के इतकं झालं असल्याचं सांगण्यात आलं आहे.

त्यानंतर 24 मार्च रोजी पुन्हा रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. हा आकडा 566वर पोहचला. 24 मार्च दरम्यान 23 मार्चच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या वाढण्याची गती 23.43 टक्क्यांवर पोहचली. 25 मार्च रोजी संख्या कमी होत हा दर 11.62 टक्क्यांवर आला. 26 मार्च रोजी देशभरात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या वाढत 720 इतकी झाली.

27 मार्च रोजी काही प्रमाणात वाढ झाली. 26 मार्चच्या तुलनेत 27 मार्चला रुग्णांच्या वाढीचा दर 12.30 टक्के झाल्याचं सांगण्यात आलं आहे. 27 मार्च रोजी 886 रुग्णांची नोंद झाली. 28 मार्चला रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्यातं समोर आलं. नवीन रुग्णांची संख्या 5.31 टक्के इतकी झाल्याची माहिती आहे. 28 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोरोना रुग्णांचा आकडा 933 वर पोहचला असल्याची नोंद करण्यात आली आहे.