पतीला खांटेला बांधून कुऱ्हाडीने केले तुकडे, मुलाला म्हणाली, 'तुझे वडील बेपत्ता झालेत'; घटनाक्रम ऐकून पोलीसही हादरले

Crime News: पतीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे. महिलेने कुऱ्हाडीने पतीची हत्या केल्याची आणि नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान सगळा घटनाक्रम ऐकून पोलीसही चक्रावले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jul 28, 2023, 09:56 AM IST
पतीला खांटेला बांधून कुऱ्हाडीने केले तुकडे, मुलाला म्हणाली, 'तुझे वडील बेपत्ता झालेत'; घटनाक्रम ऐकून पोलीसही हादरले title=

Crime News: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एका महिलेने आपल्या पतीची अत्यंत निर्घृणपणे हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने कुऱ्हाडीने आपल्या पतीची हत्या केली असल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. पिलभित येथे ही घटना घडली आहे. महिलेने पतीला आधी खाटेला बांधलं. नंतर कुऱ्हाडीने वार करुन त्याची हत्या केली. इतकंच नाही तर हत्या केल्यानंतर तिने पतीच्या मृतदेहाचे पाच तुकडे केले आणि कालव्यात फेकून दिले. हा सगळा घटनाक्रम ऐकल्यानंतर पोलीसही चक्रावले आहेत.
 
रामपाल असं पीडित 55 वर्षीय पतीचं नाव आहे. गजरोला येथील शिवनगर परिसरात ते वास्तव्यास होते. रामपाल यांचा मुलगा सोनपाल हा जवळच आपल्या पत्नी आणि मुलांसह राहतो. त्याने सर्वात प्रथम पोलीस ठाण्यात वडील सोनपाल बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. 

रामपाल यांची पत्नी दुलोरा देवी आपल्या पतीच्या मित्रासह गेल्या अनेक दिवसांपासून राहत होता. महिन्याभरापूर्वी ती आपल्या घरी परतली होती. तिने आपल्या मुलाला त्याचे वडील बेपत्ता असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, मुलाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. यावेळी चौकशी करत असताना पोलिसांना दुलोरा देवी हिच्यावरच सशंय आला. यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि कसून चौकशी करण्यास सुरुवात केली. 

पोलिसांनी खाकी हिसक्या दाखवताच महिलेने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामपाल रविवारी रात्री झोपलेले असतानाच त्यांची हत्या करण्यात आली. दरम्यान हत्या केल्यानंतर आपण मृतदेहाची विल्हेवाट लावण्यसाठी तुकडे करुन कालव्यात फेकल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. यानंतर पोलिसांनी शोध सुरु केला. 

दुलोरा देवीने दिलेल्या माहितीनंतर पोलीस कालव्यात फेकून देण्यात आलेल्या मृतदेहाचे तुकडे शोधत आहे. यासाठी ते पाणबुड्यांची मदत घेत आहेत. दरम्यान, पोलिसांना आतापर्यंत पीडित रामपालचे रक्ताने माखलेले कपडे आणि चादर कालव्यातून सापडली आहे. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.