ड्रायव्हरला हार्ट अटॅक आल्यानंतर गर्दीत घुसली बोलेरो कार; पुढे काय झालं पाहा

रस्त्यावरुन शोभायात्रा जात असतानाच मागे उभ्या असलेल्या बोलेरो गाडीच्या चालकाला ह्रदयविकाराच झटका आला. यानंतर गाडी थेट गर्दीत घुसली आणि जवळपास 1 डझन लोकांना चिरडलं.   

शिवराज यादव | Updated: Feb 22, 2024, 02:33 PM IST
ड्रायव्हरला हार्ट अटॅक आल्यानंतर गर्दीत घुसली बोलेरो कार; पुढे काय झालं पाहा title=

राजस्थानच्या नागौर येथील डेगाना येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. विश्वकर्मा जयंती साजरी केली जात असताना ही दुर्घटना घडली आहे. जयंती साजरी करण्यासाठी शोभायात्रा काढली जात असतानाच नियंत्रण सुटलेला एक गाडी थेट गर्दीत घुसली. या गाडीने जवळपास 1 डझनहून अधिक लोकांना चिरडलं. यामधील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर इतर जखमींना अजमेरला पाठवण्यात आलं आहे. काही जखमींवर डेगानामध्ये उपचार सुरु आहे. शोभायात्रेत अनेक लहान मुलं आणि महिलाही सहभागी झाल्या होत्या. 

दुर्घटनेनंतर घटनास्थळी लोकांनी एकच गर्दी केली होती. नंतर लोकांच्या लक्षात आलं की, चालकाला ह्रदयविकाराचा झटका आला असल्याने कारवरील नियंत्रण सुटलं होतं. कार लोकांना चिरडतच पुढे गेली. ही दुर्घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ज्यामध्ये गाडी गर्दीत घुसून त्यांना चिरडत पुढे जात असल्याचं दिसत आहे. 

समोर आला व्हिडीओ

सीसीटीव्हीत दिसत आहे त्यानुसार, रस्त्यावरुन शोभायात्रा धीम्या गतीने जात होती. यावेळी त्यात बरेच लोक सहभागी झाले होते. यावेळी बोलेरो कार त्यांच्या मागे होती. यादरम्यान अचानक बोलेरो कारचा वेग वाढतो आणि थेट गर्दीत घुसते. शोभायात्रेत सहभागी लोकांना काही कळण्याआधीच कार लोकांना चिरडत पुढे निघून जाते. यानंतर तिथे एकच गदारोळ सुरु होतो. 

यानंतर लक्षात येतं की, चालकाला ह्रदयविकाराचा झटका आला आहे. ज्यामुळे तो बेशुद्ध झाला आणि गाडीवरील नियंत्रण सुटलं. 

सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. यानंतर नेटकरी अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. दुर्घटना झाली तो रस्ता इतका छोटा असताना तिथे बोलेरो कशी काय आली अशी विचारणा काहीजण करत आहेत. तसंच वर्दळीच्या ठिकाणी शोभायात्रेला परवानगी दिली असताना ते कारही सोबत घेऊन आले होते का अशी विचारणा काहींनी केली आहे.