Ganga River: गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांमध्ये 1,400हून अधिक सूसर आणि 1,899 कासव पुन्हा सोडण्यात आले आहे. जल शक्ति मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पाण्याची गुणवत्तेत सुधार होण्यासाठी हा मार्ग वापरण्यात आला आहे. कासव आणि सूसर गंगा नदीच्या नैसर्गिक शुद्धीकरणासाठी महत्त्वपूर्ण आहे. कासव गंगेला नैसर्गिकरित्या स्वच्छ करतात. ते सडलेले जैव पदार्थ आणि शेवाळ खातात ज्यामुळं प्रदूषण रोखण्यास मदत मिळते आणि नदीच्या पोषक तत्वांचे पुनर्चक्रण सुनिश्चित होते.
सूसर माशांची शिकार करुन त्यांच्या संख्येत संतुलित ठेवते. यामुळं माशांची संख्या आवश्यकतेपेक्षा जास्त अधिक होत नाही. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सूसर आणि कासव नदीत पुन्हा सोडण्यात आल्याने जैव विविधतेचे संरक्षण करण्याचा प्रयत्नाचा एक भाग आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी गंगा पुनरुज्जीवनावरील एम्पॉर्ड टास्क फोर्सच्या (ईटीएफ) 13व्या बैठकीत या मुद्द्यावर प्रकाश टाकण्यात आला. ‘नमामि गंगे मिशन’ अंतर्गत ही बैठक झाली असून यात प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला आणि गंगा नदीच्या खोऱ्याच्या पुनरुज्जीवनासाठीच्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.
मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत वक्तव्यानुसार, गंगा नदीही भारताची संस्कृती, आस्था आणि जीवनवाहिनी आहे. त्यामुळं गंगा नदीचे रक्षण करणे हे राष्ट्रीय कर्तव्य मानले पाहिजे, असं पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच, या योजना वेळेत पूर्ण करण्याचे आदेशदेखील त्यांनी दिले आहेत. मिशन गंगाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी 1,34,104 हेक्टर जमिनीवर वृक्ष लागवड करायची आहे. आतापर्यंत 33,024 हेक्टर जमिनीवर झाडांची लागवड करण्यात आली आहे. तर, 59,850 हेक्टर अतिरिक्त जमीन कव्हर करण्यात आली आहे. प्रदेशाला हरित बफर क्षेत्र बनवण्यासाठी आणि स्थानिक प्रजातींना पुनस्थापित करण्यासाठी, वायु व जल गुणवत्ता सुधारणे, यासाठी हे प्रयत्न करण्यात येत आहेत.