मुंबई : सचिन कुंडलकर आपल्या अनो्ख्या शैलीत एक नवाकोरा चित्रपट घेऊन येत आहे. चित्रपटाचे नाव आहे गुलाबजाम. नाव ऐकताच चित्रपटात काय असेल याची उत्सुकता लागून राहते. चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भुमिका आहेत.
या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. यात सोनाली आणि सिद्धार्थ हे दोघे शेफच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे. टीझरमध्ये सोनाली पाककले विषयी माहिती देताना पाहायला मिळते. सचिन कुंडलकर यांच्या चित्रपटातील वेगवेगळ्या प्रयोगांचे सातत्याने कौतुक होत असते. त्यामुळे चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास समर्थ ठरतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
‘गुलाबजाम’ ही लंडनमध्ये राहणा-या भारतीय माणसाची गोष्ट आहे. यातून पहिल्यांदाच सोनाली आणि सिद्धार्थ ही जोडी रसिकांच्या भेटीला येणार आहे. मराठी पारंपारिक खाद्यपदार्थ शिकण्यासाठी आदित्य म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर भारतात येतो आणि पुण्यात आदित्यची भेट राधा अर्थात सोनालीशी होते.
राधा त्याला भारतीय पारंपारिक खाद्यपदार्थ शिकवण्याचे ठरवते. आणि त्यातून मैत्री आणि पुढचा प्रवास याचीच ही गोष्ट आहे.