मुंबई : देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. आता बॉलिवूडमध्ये देखील कोरोना व्हायरसने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. अनेक प्रसिद्ध कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये देखील भीतीचे वातावरण आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट, अक्षय कुमार पाठोपाठ गोविंदा देखील कोरोनाच्या जाळ्यात सापडला आहे. अधिक धक्कादायक गोष्ट म्हणजे अभिनेता अक्षय कुमार स्टारर 'राम सेतू' सिनेमातील तब्बल 45 कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. परिस्थिती पाहाता सेटवर योग्य ती काळजी घेण्यात आली नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
'राम सेतू' सिनेमाची शुटिंग मुंबईच्या मड आयलँड याठिकाणी सुरू होती. शनिवारी अक्षय कुमार, जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरूचा देखील चित्रीकरणासाठी उपस्थित होते. अक्षय कुमार आणि विक्रम मल्होत्राच्या प्रॉडक्शन हाऊसद्वारे तयार होत असलेल्या सिनेमाच्या सेटवर सर्व नियम पाळण्यात येतील असा दावा करण्यात आला होता. पण सद्य स्थिती पाहाता सर्व दावे फोल ठरल्याचं दिसत आहे.
सेट वर 45 लोकांना कोरोना झाल्याचं समजत आहे. पण आता अक्षयच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिस्थितीवरून असं लक्षत येत आहे, की सेट वर कोणत्याही प्रकारची खबरदारी बाळगण्यात आली नाही. त्यामुळे आता अन्य लोकांना देखील कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता आहे.
सेटवरील 100 जणांपैकी 45 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. सिनेमातील कलाकारांना कोरोनाची लागण झाल्यामुळे सिनेमाचं चित्रीकरण 15 दिवस पुढे ढकलण्यात आलं आहे.