China Coronavirus : कोरोनाच्या आकडेवारीवरून WHO नं चीनचे उपटले कान, म्हणाले, आम्हाला अजूनही...

चीनकडून योग्य पद्धतीने कोरोना रुग्णांची आकडेवारी मिळत नसल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

Updated: Jan 12, 2023, 02:57 PM IST
China Coronavirus : कोरोनाच्या आकडेवारीवरून WHO नं चीनचे उपटले कान, म्हणाले, आम्हाला अजूनही... title=
WHO reiterates need for China to share more Covid data (Photo - Reuters/AP)

जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच Who ने बुधवारी कोरोनाच्या मुद्द्यावरुन चीनचे कान उपटले. चीनने कोरोनाच्या (China Corona Updates) उद्रेकासंदर्भात अधिक माहिती जागतिक आरोग्य संघटनेबरोबर शेअर करणं आवश्यक असल्याचं डब्ल्यूएचओने म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत येणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेनं (Who) चीन खरी माहिती लपवत असल्याचं अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे. चीनच्या अधिकृत आकडेवारीमधून कोरोनाचा खरी माहिती मिळत नसल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे. सध्या चीनमध्ये वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या आणि आकडेवारीचा ताळमेळ बसत (Coronavirus) नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.

डॉक्टरांनी पुढाकार घेणं आवश्यक

प्रसारमाध्यमांशी बोलताना जागतिक आरोग्य संघटनेचे निर्देशक मायकल रेयन यांनी, "जागतिक आरोग्य संघटनेच्या मते आजही चीनमधील मृतांची नोंदणी ही प्रत्यक्ष आकडेवारीपेक्षा कमी नोंदवली जात आहे," असं म्हटलं आहे. तसेच चीनमध्ये कोरोना मृत्यूसंदर्भातील व्याख्या ही फारच चुकीची असल्याबद्दलही रेयन यांनी नाराजी व्यक्त केली. "सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी अशा मृत्यूंची नोंद होईल यासंदर्भात पुढाकार घेणं गरजचे आहे. त्यांनी ही आकडेवारी लपवण्यास प्रोत्साहन देता कामा नये," असंही रेयन यांनी म्हटलं आहे.

चीनकडून आकडेवारी मिळालेली नाही

रेयान यांनी चीनकडून योग्य माहिती मिळत नसल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. "आम्हाला अजूनही चीनकडून सविस्तर आकडेवारी मिळालेली नाही. आम्हाला यासंदर्भातील सविस्तर अहवाल बनवण्यासाठी पुरेशी माहिती पुरवण्यात आलेली नाही," असंही रेयान म्हणाले. चीनमधून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचण्या बंधनकारक करण्याच्या काही देशांच्या निर्णयालाही जागतिक आरोग्य संघटनेनं अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे. "आकडेवारीच उपलब्ध नसल्याने अनेक देशांनी सावध भूमिका घेतली असून जागतिक आरोग्य संघटना त्यांची काळजी समजू शकते," असंही रेयान यांनी म्हटलं आहे.

योग्य पद्धतीने चाचण्या न करणाऱ्या देशांबद्दल चिंता

जागतिक आरोग्य संघटेनेनं चीनबरोबरच इतर अनेक देशांबद्दलही चिंता व्यक्त केली आहे जे योग्य पद्धतीने चाचण्या करत नाहीत. या देशांमधील सध्याच्या पद्धतींमुळे कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची माहिती मिळवण्यातही अचडणी निर्माण होत असल्याबद्दलही जागतिक आरोग्य संघटनेनं चिंता व्यक्त केली.