नवी दिल्ली : एफएटीएफने ब्लॅक लिस्टमध्ये टाकू नये, म्हणून पाकिस्तानने दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्येच असल्याचं मान्य केलं. पण आता २४ तासांमध्येच पाकिस्तानने पलटी मारली आहे. दाऊद इब्राहिम कराचीमध्ये असल्याचं पाकिस्तानने कबूल केलं, पण पाकिस्तानी लष्कराच्या दबावानंतर सरकारने पलटी मारली आणि दाऊदला दहशतवादी मानण्यास पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने नकार दिला आहे.
पाकिस्तान दाऊद इब्राहिमवरुन पलटल्यानंतर भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. दहशतवादी, माफिया आणि अराजकता पसरवणाऱ्या लोकांना आश्रय देणं हीच पाकिस्तानची ओळख बनली आहे. तिथल्या लोकप्रतिनिधींकडे काही अधिकार नाहीत, दाऊदला पाकिस्तानच्या लष्कराचं समर्थन आहे, त्यामुळे दाऊदवर प्रहार म्हणजे पाकिस्तानी लष्करावर आणि पाकिस्तानवर प्रहार अशी तिथली समजूत आहे, अशी टीका भाजपचे राज्यसभा खासदार राकेश सिन्हा यांनी केली आहे.
खरं बोलल्यामुळे जगात आपली विश्वासार्हता वाढेल, असं पाकिस्तानला वाटलं होतं. पण पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांच्या दबावात पाकिस्तानली सरकारला आपलं वक्तव्य फिरवावं लागलं, असंही राकेश सिन्हा म्हणाले आहेत.
दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्येच असल्याचं कालच पाकिस्तानने कबूल केलं होतं. पण भारतासाठी मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असलेला दाऊद आपल्याकडे शरण असल्याचं मान्य केलं तर याचे विपरित परिणाम होतील, या भीतीने पाकिस्तानने दाऊदला दहशतवादी मानायला नकार दिला.
व्हाईट हाऊस, सौदी मशिदीजवळ, क्लिप्टन रोड कराची
हाऊस नंबर ३७, ३० स्ट्रीट डिफेन्स हाऊसिंग अथॉरिटी, कराची
हवेली, नुराबाद, कराची
दाऊद इब्राहिमचे पाकिस्तानमधील हे तीन पत्ते असल्याचं त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाने मान्य केलं होतं.
पाकिस्तानने दहशतवादी कारवायांशी जोडल्या गेलेल्या ८८ नेते आणि दहशतवादी गटांशी जोडल्या गेलेल्या सदस्यांवर कारवाईचं आश्वासन दिलं. या ८८ जणांची यादी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने जाहीर केली. या यादीमध्ये दाऊद इब्राहिम, जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर आणि जकीउर रहमान लखवी यांच्या नावाचा समावेश आहे.