Afghanistan : तालिबानची दहशत... अफगाण वंशाच्या भारतीय नागरिकाचं काबूलमध्ये अपहरण

अफगाणीस्तानमध्ये तालिबानच्या दहशतीचा कहर

Updated: Sep 15, 2021, 09:38 AM IST
Afghanistan : तालिबानची दहशत... अफगाण वंशाच्या भारतीय नागरिकाचं काबूलमध्ये अपहरण title=

काबूल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता स्थापन झाली आहे. त्याठिकाणी तालिबानची दहशत सुरू आहे. अफगाणिस्तानमधील अनेक प्रांतात तालिबान सत्ता गाजवत आहेत. सामान्य  नागरिकांवर अत्याचार सुरू आहेत. दरम्यान एक धक्कादायक बातमी मिळत आहे. राजधानी काबुलमध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाण वंशाच्या भारतीय नागरिकाचे बंदुकीच्या धाकाने अपहरण केले. इंडियन वर्ल्ड फोरमचे अध्यक्ष पुनीत सिंह चंडोक यांनी ही माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, या व्यावसायिकाचे नाव बंसारी लाल असून त्याचे कुटुंब हरियाणाच्या फरीदाबाद येथे राहते. बंसारी लाल काबूलमध्ये औषध उत्पादनांचा व्यवसाय करतात. ते मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास आपल्या कर्मचाऱ्यांसह दुकानाकडे जात असताना त्याच्या कारला मागून धडक दिली. 

यानंतर दहशतवाद्यांनी बंसारी लाल आणि कर्मचाऱ्यांचं बंदुकीच्या धाकाने अपहरण केले. 50 वर्षीय बंसारी लाल हे शीख समुदायाचे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंसारी लाल आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची तालिबानकडून मारहाण करण्यात आली आहे. स्थानिक तपास यंत्रणांनी  अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून सध्या त्यांचा शोध सुरू आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून मदतीची मागणी 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन सरकारकडे करण्यात आले आहे.