अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या ७ लाखांवर; ३५ हजारहून अधिकांचा मृत्यू

'अमेरिकेत आतापर्यंत 37.8 लाखांहून अधिकांची कोरोना चाचणी करण्यात आली'

Updated: Apr 18, 2020, 05:34 PM IST
अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या ७ लाखांवर; ३५ हजारहून अधिकांचा मृत्यू title=
फोटो सौजन्य : Reuters

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसचा प्रकोप सुरु असलेल्या अमेरिकेत शुक्रवारी कोरोना रुग्णांच्या संख्येने 7 लाखांचा आकडा पार केलाय. तर 35 हजारांहून अधिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बाल्टीमोर येथील जॉन्स हॉप्किन्स विद्यापिठाने याबाबत माहिती दिली आहे. 

कोरोना माहामारीचं केंद्र बनलेल्या न्यूयॉर्कमध्ये 14 हजारहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 2 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर शेजारील न्यूजर्सीमध्ये 78 हजारांहून अधिक कोरोनाबाधित असून 3800 लोकांचा मृत्यू झाला आहे.

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी, अमेरिकेत आतापर्यंत 37.8 लाखांहून अधिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. ही संख्या कोणत्याही देशात केलेल्या चाचण्यांपैकी सर्वाधिक आहेत. सर्वात प्रभावित असलेल्या न्यूयॉर्क, लुइसियाना या भागात दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि इतर देशांच्या तुलनेत अधिक लोकांची चाचणी झाली. अमेरिकेत जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत अधिक मजबूत, प्रगत आणि अचूक चाचणी प्रणाली असल्याचं ट्रम्प त्यांनी सांगितलं. 

प्रशासनाने कोरोना विषाणूला रोखण्यासाठी व्यापक प्रयत्न केले नसते तर मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या याहून अधिक असती. आमच्या देशात आणि जगातील 184 देशांमध्ये जे झालं ते  अतिशय भयंकर आहे. अशी भयंकर स्थिती पुन्हा कधी येऊ नये, गेले काही महिने देशाच्या इतिहासातील सर्वाधिक आव्हानात्मक असल्याचं, ट्रम्प यांनी सांगितलं.

जगभरात जवळपास 22 लाख 40 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनामुळे 1 लाख 53 हजारांहून अधिकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची सर्वाधिक संख्या अमेरिकेत आहे. तर अमेरिकेनंतर इटली, स्पेन या देशांमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडाही सर्वाधिक आहे.