Shiv Sena Versova Shakha Conflict: मुंबईत पुन्हा एकदा शाखेच्या वादावरुन दोन्ही शिवसेना आमने सामने उभ्या ठाकल्यात. कालच शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या राजूल पटेल यांच्यामुळे हा वाद उभा राहिलाय. नेमकं काय घडलं वर्सोव्याच्या शिवसेना शाखेत, आणि त्यावरुन दोन्ही शिवसेनेत कशी जुंपलीय? जाणून घेऊया.
मुंबईत वर्सोव्याच्या शिवसेना शाखेवरुन मोठा वाद पेटलाय. माजी नगरसेविका आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या राजूल पटेल यांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला.. मात्र शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करण्याआधी शाखेला टाळं लावून राजूल पटेल यांनी चावी स्वतःकडे ठेवली. ही बाब कळताच शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी वर्सोव्याच्या शिवसेना शाखेबाहेर जमले.. अगदी आमदार अनिल परब, आमदार हारुन खानही तिथं हजर झाले. तातडीनं शाखेची चावी परत द्या अन्यथा पुढच्या परिस्थितीला आम्ही जबाबदार नाही असा इशाराच शिवसैनिकांनी दिला. तर आपण मार खाऊन ती शाखा बांधलीय आणि वाचवल्याची आठवण अनिल परबांनी सांगितली. ज्यांना बाळासाहेब, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेमुळे ओळख मिळाली त्यांनी गद्दारी केली असा घणाघातही परबांनी केला.
राजूल पटेल यांची अंधेरी वर्सोवातील कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख आहे. राजूल पटेल मुंबई महापालिकेत 3 वेळा नगरसेविका होत्या. अंधेरी वर्सोवात पटेलांचा दबदबा आहे. महिला संघटनेत त्यांचा हातखंडा आहे. विधानसभेला उमेदवारी न मिळाल्यानं राजूल पटेल नाराज होत्या.
महापालिका निवडणुकीआधी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश राजूल पटेल एकनाथ शिंदेंसोबत गेल्या असल्या तरी त्या निवडून कशा येतात ते पाहू असा इशाराच परबांनी दिलाय.
आमदार खासदारांप्रमाणं आता महापालिका निवडणुकीआधी नगरसेवकांचंही इनकमिंग आऊटगोईंग सुरू झालंय. त्यानिमित्त दोन्ही शिवसेनेत सध्या मोठी रस्सीखेच सुरूय. त्यात खरी शिवसेना कुणाची इथपासून ते शिवसेनेची शाखा कुणाची इथपर्यंतचा वाद शाखेशाखेत आजही सुरू असल्याचं दिसतंय.. अगदी मुंबईपासून ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीतल्या शाखांबाबतही असाच राडा मागच्या 2 अडीच वर्षात जनतेनं पाहिलाय. आता मीरारोडसह वर्सोव्यातही हा शाखा वाद अधिकच पेटण्याची चिन्हं आहेत.