Krishna Andhale : सरपंच संतोष देशमुख हत्येच्या 49 दिवसांनंतरही आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. कृष्णा आंधळेचा घातपात झाला असावा, तो आता सापडेल असं वाटत नाही, असा संशय आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केलाय. यावरून मंत्री धनंजय मुंडेंनी क्षीरसागर यांच्यावरच गंभीर आरोप केलेत. त्यामुळे कृष्णा आंधळेचा घातपात तर झाला नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संतोष देशमुखांच्या हत्येला 49 दिवस पूर्ण झालेत. अद्यापही या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. संपूर्ण पोलीस खातं कृष्णा आंधळेच्या मागावर असतानाही तो सापडत नाहीय. आमदार संदीप क्षीरसागर यांनी यासंदर्भात संशय व्यक्त केलाय. कृष्णा आंधळेचा घातपात झाला असावा. तो आता सापडेल असं वाटत नाही, असा संशय क्षीरसागर यांनी व्यक्त केलाय. विषय अंगलट आला की तो माणूस गायब होतो, हा बीडचा इतिहास असल्याचंही क्षीरसागर यांनी म्हटलंय.
संशय व्यक्त करणाऱ्या क्षीरसागरांवर मुंडेंचेच आरोप
क्षीरसागर यांनी संशय व्यक्त केला मात्र यावर मंत्री धनंजय मुंडेंनी क्षीरसागर यांच्यावरच पलटवार केलाय. कृष्णा आंधळे आणि संदीप क्षीरसागर यांचे संबंध आहे, असा गंभीर आरोप धनंजय मुंडेंनी केला. क्षीरसागरांकडे इतकी माहिती कशी आली? असा सवालही मुंडेंनी केलाय.
कृष्णा आंधळे हा गरीब घरातला तरुण होता. वाल्मिकच्या नादाला लागून तो गुन्हेगारीकडं वळल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय. कृष्णा आंधळेही काही दिवसांत पोलिसांच्या हाताला लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. पण संदीप क्षीरसागरांनी काढलेला निष्कर्षाशी असहमत असल्याचं त्यांनी सांगितलंय.
हत्येच्या 49 दिवसांनंतरही कृष्णा आंधळे फरार
कृष्णा आंधळे कुठं आहे, याचा पोलिसांना शोध लागत नाहीय. पोलिसांनी त्याच्यावर दुसऱ्यांदा बक्षीस जाहीर केलंय. कृष्णा आंधळेनं कुणाशीही संपर्क साधला नसल्याचं सांगण्यात येतंय. पण ही शक्यता फारच कमी आहे. कृष्णा आंधळेला शोधणं पोलिसांसाठी फार कठीण गोष्ट नाही असं सांगितलं जातंय. आंधळेजवळ अशी कोणती माहिती आहे जी बाहेर येऊ नये म्हणून त्याला फरार ठेवलं जातंय का, असा प्रश्न विचारला जातोय. कृष्णा आंधळेमागचं गूढ संपून पोलीस त्याच्या मुसक्या कधी आवळणार, हे आता पाहणं महत्त्वाचंय.