भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली तब्बल 12 वर्षांनी रणजी क्रिकेट खेळत आहे. 30 जानेवारीला दिल्लीचा संघ रेल्वे संघाशी भिडणार आहे. सामन्याला दोन दिवस शिल्लक असताना मैदानातील विराट कोहलीच्या उपस्थितीमुळे जणू काही एखादा सण साजरा केला जात आहे असं वातावरण आहे. कडाक्याच्या थंडीत विराट कोहली सकाळी फिरोजशाह कोटला मैदानात पोहोचला तेव्हा त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. नवदीप सैनी वगळता दिल्ली संघातील एकाही खेळाडूची त्याच्याशी प्रत्यक्ष भेट झाली नसल्याने उत्सुकता होती. दरम्यान या सर्व गर्दीत चौथीत शिकणारा कबीरही होता.
दिल्लीतून आपल्या क्रिकेट करिअरला सुरुवात करणारा 'चिकू' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील स्टार झाल्यानंतर त्याच्या मित्रांकडे फक्त आठवणीच होत्या. सोमवारी तीन तास तो मैदानात असताना, अनेकांना आपलं स्वप्न सत्यात पूर्ण होताना दिसत होतं. यामध्ये तरुण खेळाडूंपासून ते हंगामी मुख्य प्रशिक्षक सरनदीप सिंग किंवा फलंदाज प्रशिक्षक बंटू सिंग असोत, सर्वजण होते. प्रत्येकाला त्याच्या जवळ जायचं होतं.
या सर्व गर्दीत लाल जॅकेट आणि काळी पँट घातलेला कबीर विराट कोहलीची भेट होईल या आशेने त्याच्याकडे एकटक पाहत होता. विराट कोहलीने सरावासाठी तयारी केली असता त्याचं हे स्वप्न पूर्णही झालं. पण याचं श्रेय त्याचे वडील शावेजला आहे. त्याच्याशिवाय कबीरला विराट कोहलीच्या जवळही जाता आलं नसतं. त्याला फक्त विराटशी गप्पा मारण्याची संधी मिळाली नाही, तर त्याने कोहलीचा फोटो असणाऱ्या पोस्टरवर स्वाक्षरीही घेतली.
Finally, Kabir got a chance to meet his idol https://t.co/tUJowOYA2w pic.twitter.com/lp5YtDsVEW
— Daya sagar (@sagarqinare) January 28, 2025
शावेज आणि विराट दोघेही एकत्र खेळले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही एक रियुनिअनच होती. विराट कोहलीने शावेजशी गप्पा मारण्यासाठी सराव थांबवला होता. यानंतर दोघेही गप्पा मारताना दिसत होते. यादरम्यान कबीरच्या हातात 'अंकल कोहली' पोस्टर होतं. कबीरने यावेळी विराट आणि त्याच्या वडिलांचा एकत्रित फोटोही काढला.
चौथीत शिकणारा कबीर 'अंकल विराट' लिहिलेलं चित्र घेऊन पोहोचला होता. कबीरचे वडील आणि विराट दिल्ली अंडर-17 आणि अंडर-19 क्रिकेट एकत्र खेळले आहेत. "आमचा बीडीएमसोबत बॅटचा करार होता आणि आम्ही बॅट घेण्यासाठी एकत्र जायचो. आम्ही खूप जुने मित्र आहोत," असं शवेज म्हणाला.
जेव्हा कबीरला कोहलीशी झालेल्या त्याच्या संभाषणाबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला: "मी त्याला विचारले की मी भारतासाठी कसा खेळू शकतो? तो म्हणाला, 'तुला कठोर सराव करावा लागेल. आणि तुला सरावला जा सांगण्याची वेळ तुझ्या वडिलांवर येता कामा नये. उलट तू वडिलांना सांग की, मला सरावाला जावे लागेल".