ब्रिटन : शालेय जीवनात अनेक विद्यार्थ्यांचा गणित हा नावडता विषय असतो. गणितातील अनेक गोष्टी डोक्यात शिरत नसल्याने अनेकांना या विषयाची भीती मनात असते. या धास्तीमुळेच गणित हा अनेकांचा नावडीचा विषय ठरतो. पण ब्रिटनमधल्या एका १४ वर्षांच्या मुलाला गणिताची अजिबात भीती वाटत नाही. या मुलाचं नाव याशा अॅशले असं आहे. हा विषय त्याला इतका आवडतो की ह्यात त्याचा हातखंड आहे. इतकंच नाही तर त्याचं या विषयावरील प्रभुत्त्व पाहून इंग्लडमधल्या लीसेस्टर विद्यापीठाने त्याला चक्क प्राध्यापकाची नोकरी देऊ केली आहे.
लीसेस्टर विद्यापीठात प्रवेश घेणारा आणि शिकवणारा याशा हा सर्वात तरुण प्राध्यापक ठरला आहे. याशाला वयाच्या तेराव्या वर्षीच विद्यापीठाकडून ही नोकरी देण्यात आल्याचं एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटलं आहे. याशा अजूनही लहान आहे पण त्याचे विषयावरील प्रभुत्त्व पाहता त्यासाठी खास परवानगी विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्राध्यापकाच्या पदासाठी अनेक उमेदवार होते, प्रतिस्पर्धी वरचढ असले तरी या सर्वांमध्ये याशा उजवा ठरला.
विद्यापीठातील विद्यार्थ्यांना तो गणितात मदत करतो. गणितातील शंका, अडलेली गणिते घेऊन अनेक विद्यार्थी याशाकडे येतात. याशाला सगळेच 'कॅलक्युलेटर' म्हणून हाक मारतात. शाळेत जाण्यापेक्षा ही नोकरी मला अधिक आवडते, असं याशा मोठ्या उत्साहात प्रत्येकाला सांगतो.