मोक्कारपंती ग्रुप अन् 'तो' व्हिडीओकॉल, सरपंच संतोष देशमुखांना मारहाण होताना सहा जण पाहत होते

Beed Santosh Deshmukh: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठ्या अपडेट समोर येत आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 12, 2025, 11:09 AM IST
मोक्कारपंती ग्रुप अन् 'तो' व्हिडीओकॉल, सरपंच संतोष देशमुखांना मारहाण होताना सहा जण पाहत होते title=
beed case update accused Video Call Of Beating Sarpanch Santosh Deshmukh

Beed Santosh Deshmukh: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एक मोठी माहिती समोर येत आहे. संतोष देशमुख यांचे आरोपींनी अपहरण केले होते. अपहरणानंतर त्यांना मारहाण करुन त्यांची हत्या करण्यात आली. सरंपचांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. बीड हत्याकांड प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असताना या प्रकरणाच एक मोठे अपडेट समोर येत आहे. 

सरपंच संतोष देशमुख यांना अपहरण करुन मारहाण करण्यात आली होती. देशमुख यांना मारहाण होताना आरोपींकडून व्हिडिओ कॉलदेखील करण्यात आला होता. पण हा व्हिडिओ कॉल कोणा एका व्यक्तीला नव्हे तर मोक्कार पंती नावाच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रतीक घुलेने केला होता. हा व्हिडिओ कॉल 17 ते 19 वर्ष वयोगटातील 6 जणांनी पाहिल्याचे समोर आले आहे. 

अवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्पात खंडणी मागण्यासाठी गेलेल्या सुदर्शनने सुरक्षारक्षकाला मारहाण केली. नंतर भांडण सोडवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख तिथे गेले होते. मात्र तिथे वाद आणखी वाढला. खंडणी मागण्यासाठी गेलेल्या आरोपींना मारहाण करण्यात आली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

सुदर्शन घुले याचा वाढदिवसादिवशीच मारहाण झाली आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचा राग मनात ठेवून प्रतिक घुले याने संतोष देशमुख यांचे अपहरण केले. संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर आरोपी सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांकडून फायटर, गॅस पाईप, आणि काठीने संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली. जयराम चाटे याने व्हॉट्सअॅपवर मोक्कारपंती ग्रुपवर व्हिडिओ कॉलकरुन मारहाणीचा आणि त्याच्या अगोदरचा व्हिडिओदेखील दाखवला असल्याचे समोर आले आहे. 

विष्णु चाटेचा फोन अद्याप गायबच

आरोपी विष्णु चाटे याचा मोबाईल मात्र अद्याप 'सीआयडी'ला सापडला नाहीये. विष्णु चाटे याचा मोबाईल अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण विष्णु चाटे याच्या फोनवरुन वाल्मिक कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलला होता. त्यावरुन त्याने 2 कोटींच्या खंडणीची मागणी केली होती तेव्हाच त्याने हातपाय तोडण्याची धमकीदेखील दिली होती. या प्रकारच्या ऑडियो क्लिप पोलिसांना सापडल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळं तपासाला वेग येण्यासाठी विष्णु चाटे याचा फोन अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे. फरार असताना विष्णु चाटे हा नाशिकमध्ये होता. तिथेच त्याने फोन कुठेतरी फेकला आहे. मात्र फोन कुठे फेकला हे तो सांगत नाहीये. यामुळं मोबाइल शोधण्याचे मोठं अव्हान पोलिसांसमोर असणार आहे.