'मी कर्णधार झालो तेव्हापासूनच....', WC फायनलआधी रोहित शर्माने थोपटले दंड; म्हणाला 'यानंतर माझं करिअर...'

वर्ल्डकपच्या पूर्वसंध्येला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेत आपण कर्णधार झाल्यापासून या दिवसाची तयारी करत होतो असं सांगितलं आहे. तसंच संघाची प्लेइंग 11 कशी असेल याबाबतही सूचक विधान केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 18, 2023, 06:46 PM IST
'मी कर्णधार झालो तेव्हापासूनच....', WC फायनलआधी रोहित शर्माने थोपटले दंड; म्हणाला 'यानंतर माझं करिअर...' title=

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये वर्ल्डकप फायनल खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान वर्ल्डकपच्या पूर्वसंध्येला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्याने आपण कर्णधार झाल्यापासून या दिवसाची तयारी करत होतो असं सांगत दंड थोपटले आहेत. तसंच संघाची प्लेइंग 11 कशी असेल याबाबतही सूचक विधान केलं आहे. 

'मी कर्णधार झाल्यापासून या दिवसासाठी तयार'

"मी कर्णधार झाल्यापासूनच आम्ही या दिवसाची तयारी सुरु केली होती. आम्ही गेल्या 2 वर्षात प्रत्येक खेळाडूची निवड केली आहे. आम्ही प्रत्येकाला त्याची काय भूमिका असेल हे स्पष्ट केलं आहे. यासंबंधी माझ्यात आणि प्रशिक्षकामध्ये अनेक चर्चाही झाल्या. या प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यात प्रत्येकाला त्याची भूमिका माहिती असणं मोलाचं ठरलं आहे. आम्ही ते स्पष्ट राहावं यासाठी मेहनत घेतली असून, उद्याही त्याचा फायदा होईल अशी आशा आहे," असं रोहित शर्माने सांगितलं. 

"ऑस्ट्रेलिया काय करु शकते याची कल्पना"

"ऑस्ट्रेलियाने सर्व 8 सामने जिंकले आहेत. ते चांगलं क्रिकेट खेळत असून दोन्ही संघ अंतिम सामना खेळण्यास पात्र आहेत. ऑस्ट्रेलिया काय करु शकते याची आपल्याला कल्पना आहे. तो एक पूर्ण संघ आहे. आम्ही काय करु शकतो यावर आम्ही लक्ष केंद्रीत करत आहोत. ते किती चांगल्या फॉर्ममध्ये आहेत यावर आम्ही जास्त लक्ष देणार नाही. याउलट आमचं क्रिकेट आणि प्लान यावर भर देऊ," असं रोहित म्हणाला.

"भारतीय क्रिकेटर असताना तुमच्यावर दबाव असतो"

"प्रत्येक सामन्यात आम्ही संयम बाळगला असून, काय करायचं होतं याची जाणीव होती. बाहेर नेमकं काय वातावरण आहे, अपेक्षा तसंच दबाव हे सगळं आम्हाला माहिती होतं. पण आम्ही आमच्या खेळावर लक्ष केंद्रीत करणं हेच जास्त महत्वाचं होतं. आम्ही ड्रेसिंग रुममध्ये संयम राहावा यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांना आतून काय वाटतं हे मला माहिती नाही. पण मीटिंग, ट्रेनिगमध्ये प्रत्येकजण शांत असतो. तुम्ही भारतीय खेळाडू असताना दबाव हाताळावा लागतो," असं रोहितने सांगितलं.

आमचे गोलंदाज या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत आहेत. आम्ही पहिल्या 4,5 सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना समोरील संघाला 300 च्या आत रोखणं फार आव्हानात्मक होतं. पण आमचे गोलंदाज जबरदस्त खेळले असं कौतुक रोहितने केलं आहे. 

"आमच्या करिअरमधील सर्वात मोठा क्षण"

"हा एक मोठा क्षण आहे यात कोणताही वाद नाही. आतापर्यंत जे काही झालं आहे ते स्वप्नवत आहे. आव्हानांचा सामना करत लक्ष्य केंद्रीत करणं हे एका खेळाडूला सर्वाधिक आव्हानात्मक असतं. हा आमच्या करिअरमधील मोठा क्षण आहे. त्यामुळे आपली योजना नीट अंमलात यावी यासाठी संयम राखणं महत्त्वाचं आहे. तुम्ही रोज वर्ल्डकप फायनल खेळत नाही. मी वर्ल्डकप पाहत मोठा झालो आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा मोठा क्षण आहे," अशी कबुली रोहित शर्माने दिली आहे.