इंफोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांनी आठवड्यातील 70 तास काम केलं पाहिजे असं विधान केल्याने वाद निर्माण झाला होता. आता त्यांनी पुन्हा एकदा कामाच्या तासांवर भाष्य केलं आहे. कोणीही दुसऱ्या व्यक्तीवर जास्त कामाचे तास लादू नयेत आणि हे मुद्दे चर्चेसाठी नाहीत तर आत्मपरीक्षणासाठी आहेत यावर त्यांनी भर दिला आहे.
"मी हेच सांगू शकतो की, मी सकाळी 6.20 ला ऑफिसला जायचो आणि 8.30 ला घरी जात असे. हे तथ्य आहे आणि मी केलं आहे. कोणीही हे नाकारु शकत नाही आणि चुकीचं म्हणू शकत नाही. मी सलग 40 वर्षं हे केलं आहे. मला वाटतं हे काही वादाचे विषय नाहीत. त्यावर चर्चा करावी, पण वाद घालू नये. हे असे मुद्दे आहेत ज्यावर कोणीही आत्मपरीक्षण करू शकतो, ते आत्मसात करू शकतो आणि एखाद्या निष्कर्षावर येऊ शकतो आणि जे काही करायचे ते करू शकतो. कोणीही म्हणू शकत नाही की, तुम्ही ते करावे, तुम्ही ते करू नये, नाही," असं नारायण मूर्ती यांनी मुंबईतील कार्यक्रमात म्हटलं.
78 वर्षीय नारायण मूर्ती यांनी यापूर्वी जर भारताला जागतिक स्तरावर आपली पूर्ण क्षमता साकार करायची असेल तर भारतातील तरुण कर्मचाऱ्यांना कठोर परिश्रम स्वीकारावे लागतील असं म्हटलं होतं.
ऑक्टोबर 2023 मध्ये एका पॉडकास्ट दरम्यान, नारायण मूर्ती म्हणाले होते की, "भारताची कामाची उत्पादकता जगातील सर्वात कमी आहे. जोपर्यंत आपण आपली कामाची उत्पादकता सुधारत नाही, सरकारमधील भ्रष्टाचार काही प्रमाणात कमी करत नाही, कारण आपण सतत वाचत आहोत, मला त्याचे सत्य माहित नाही, जोपर्यंत आपण हा निर्णय घेण्यातील आपल्या नोकरशाहीतील विलंब कमी करत नाही, तोपर्यंत आपण त्या देशांशी स्पर्धा करू शकणार नाही ज्यांनी प्रचंड प्रगती केली आहे. म्हणून, माझी विनंती आहे की आपल्या तरुणांनी 'हा माझा देश आहे. मला आठवड्यातून 70 तास काम करायचे आहे' असं म्हणावे." त्यांनी यावेळी दुसऱ्या महायुद्धातील जर्मन आणि जपानी लोकांची उदाहरणे दिली होती.
नारायण मूर्ती यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. उद्योग जगतातील एका ज्येष्ठ उद्योजकाच्या अशा टिप्पणीमुळे कर्मचाऱ्यांचे शोषण होईल आणि काम आणि जीवनातील संतुलन राखण्याची गरज आहे असं मत अनेक सोशल मीडिया युजर्सनी मांडलं होतं. अनेकांनी असे निदर्शनास आणून दिलं होतं की, कमी वेतन असलेल्या सुरुवातीच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांकडून अशा कामाची अपेक्षा करणं अन्याय आहे. तर काहींनी कामाच्या तासांवर नव्हे तर गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असं मत मांडलं होतं.
बांधकाम आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगप्रसिद्ध कंपनी असलेल्या 'लार्सन अँड टुब्रो' म्हणजेच 'एल अँण्ड टी'चे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यन यांनी केलेल्या एका विधानामुळे ऑफिस आणि खासगी आयुष्य यांचा समतोल राखण्याचा विषय चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एसएन सुब्रमण्यन सांगत आहेत की , "मला वाईट वाटतं की मी तुम्हाला रविवारी काम करायला लावू शकत नाही. जर मी तुम्हाला रविवारीही काम करायला लावलं तर मी अधिक आनंदी होईन, कारण मी रविवारी काम करतो." यावेळी त्यांनी कर्मचारी घरी घालवत असलेल्या वेळेवरी टिप्पणी केली. "तुम्ही घरी बसून काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहू शकता? चला, ऑफिसला जा आणि कामाला लागा," असंही ते म्हणाले. यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून यात काही सेलिब्रिटींचाही समावेश आहे.